श्रीराम आणि साईबाबांच्या प्रतिमेची मिरवणूक भावभक्तीच्या वातावरणात निघाली शिर्डी (अहमदनगर) Ram Mandir Pran Pratishtha :आज सायंकाळी 5 वाजता साई मंदिरापासून प्रभू रामचंद्राची शोभा मिरवणूक साईबाबा समाधी मंदिरातून निघाली. यावेळी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रभू रामचंद्र यांची प्रतिमा धरलेली होती आणि साईबाबा संस्थानच्या अधिकाऱ्यांनी साईबाबांची प्रतिमा तसेच मंदिरातील पुजारी यांनी बाबांच्या चरण पादुका आणि सटका धरलेल्या होत्या. (Sai Baba Shirdi) ही शोभायात्रा द्वारकामाईत आल्यानंतर विधीवत पूजन होऊन प्रभू रामचंद्राची प्रतिमा, साईंची प्रतिमा, चरण पादुका आणि सटक्याची सुवर्ण रथात ठेवून शिर्डीतून मिरवणूक काढण्यात आली.
दर्शनासाठी भाविकांची गर्दी :'रामजी की निकली सवारी.. रामजी की लिला है न्यारी' अशा सुरात ढोल-ताशांच्या निनादात दोन तास ही मिरवणूक सुरू होती. भाविकही दर्शनासाठी गर्दी करत होते. 7 वाजता रथाची मिरवणूक साई समाधी मंदिरात पोहोचल्यानंतर साईंची धुपारती पार पडली.
असा साजरा करण्यात आला सोहळा :साईबाबांच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आज आयोजित करण्यात आले होते. आज सकाळ पासूनच साईबाबांच्या समाधीवर प्रभू रामचंद्र यांची प्रतिमा ठेवण्यात आली असून साईबाबां बरोबर श्रीरामाचेही दर्शन भाविक घेताहेत. आज सकाळी 10 वाजता साईबाबांच्या समाधी मंदिरात रामरक्षा स्तोत्राचे पठण करण्यात आले.
साईबाबांच्या अनुमतीने सुरू झाला उत्सव :साईबाबा देहधारी असताना त्यांनी रामोपासक डॉक्टरला तसेच एका मद्रासी कुटुंबाला द्वारकामाईत रामरूपात दर्शन दिल्याचा साईसच्चरित्रात उल्लेख आहे. विशेष म्हणजे, मशिदीत रामजन्मोत्सव सुरू करून त्यांनी श्रीराम भक्तीची ज्योत प्रज्वलित केली होती. साईबाबा अनेक भक्तांकडून भावार्थ रामायण, हरी विजय असे ग्रंथ वाचून घेत. आपल्या निर्वाणापूर्वी त्यांनी आपल्या समोर रामविजय ग्रंथांचे पारायण करवून घेतल्याचा साई चरित्रात उल्लेख आहेत. तेव्हापासूनच साईबाबांच्या शिर्डीत श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येऊ लागलाय.
दरवर्षी होते श्रीरामनवमी उत्सव:साईबाबांच्या अनुमतीनं सुरू झालेला श्रीरामनवमी उत्सव आजही साईबाबा संस्थानच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. साईबाबा संस्थानच्या वतीनं शिर्डीत तीन दिवसीय श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात पायी पालख्या घेऊन भाविक शिर्डीत दाखल होतात. श्रीरामनवमी उत्सवाच्या दिवशी साईबाबा संस्थानच्या वतीनं साईबाबा मंदिरात प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. त्याच बरोबर सायंकाळी साई संस्थानच्या वतीनं प्रभू रामचंद्र आणि साईबाबांची प्रतिमा ठेवून शहरातून मिरवणूक काढण्यात येते.
हेही वाचा:
- शिवसेना आमदार अपात्र निकाल पुन्हा न्यायालयाच्या कचाट्यात; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
- श्रीरामाचा तंबूतला 500 वर्षाचा वनवास संपला, भव्यदिव्य मंदिरात विराजमान : पंतप्रधान नरेंद्र मोदी
- श्रीराम प्रतिष्ठापने निमित्त 6 हजार किलोचा 'रामशिरा'; मंदिरांच्या नावानं आशिया बुक मध्ये नवा विक्रम