मुंबई Raksha Bandhan 2024 : देशभरात मोठ्या उत्साहात रक्षाबंधन सण साजर केला जात आहे. राग, रुसवा दूर करत बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते व सदैव सोबत राहण्याची प्रार्थना करते. तर भाऊ देखील आपल्या बहिणींचं रक्षण करण्याचं वचन तिला देतो. नात्यात दुरावा निर्माण होत असला तरी हा सण भावा-बहिणींना एकत्र आणतो.
सुप्रिया सुळे-अजित पवारांमध्ये दुरावा : राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर अजित पवार हे युतीबरोबर सत्तेत सहभागी झाले. त्यामुळं काका शरद पवार आणि बहीण सुप्रिया सुळे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात होता. तेव्हापासूनच पवार कुटुंबात दुरावा निर्माण झाला होता. टीका, आरोप करण्याची एकही संधी हे नेतेमंडळी सोडत नव्हते. अशातच आज रक्षाबंधनाचा सण आहे. त्यामुळं खासदार सुप्रिया सुळे या आपल्या भावाला म्हणजेच उपमुख्यंत्री अजित पवार यांना राखी बांधणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
खासदार भास्कर भगरेंना बांधली राखी : खासदार सुप्रिया सुळे या नाशिक दौऱयावर आहेत. नाशिक दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली. याप्रसंगी भगरे कुटुंबिय उपस्थित होते. सर्वांना भेटून आनंद झाल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. औक्षण करतानाचा आणि राखी बांधतानाचा व्हिडिओ सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
राजकारणातल्या भावा-बहिणींमध्ये दुरावा : महाराष्ट्राच्या राजकारणात जसं काका-पुतण्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे. तसंच चित्र भाऊ आणि बहिणींमध्येही पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांनी काका दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडत राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधलं. त्यानंतर मुंडे कुटुंबात दुरावा निर्माण झाला. साहजिकच याचा परिणाम हा बहीण पंकजा मुंडे आणि भाऊ धनंजय मुंडे यांच्या नात्यावरही झाला. मात्र, रक्षाबंधनानिमित्तानं हे दोघेही भाऊ-बहीण एकत्र येत हा सण साजरा करत असतात. तसंच अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नात्यातही दुरावा निर्माण झालाय. अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतरच हा दुरावा तयार झाला.
हेही वाचा -
- रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर भद्राचं सावट: कोणत्या वेळेत बांधावी राखी? जाणून घ्या, शुभ मुहूर्त - Raksha Bandhan 2024
- भावाला बांधा आणि खा चॉकलेटची राखी, विविध पद्धतीच्या राख्या बाजारात दाखल; पाहा व्हिडिओ - Chocolate Rakhi
- पद्मश्री राहीबाईंनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी बनवली खास ‘बीज राखी’ - Raksha Bandhan Special Rakhi