नागपूर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार हळूहळू शिगेला पोहचला असतानाच ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई लिखित 'द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया' या पुस्तकानं राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पुस्तकात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या नावे अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते सर्व दावे छगन भुजबळ यांनी फेटाळून लावलेत. यावर आता राजदीप सरदेसाई आणि राज्याचे माजी गूहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली.
पूर्ण पुस्तक वाचावं : राजदीप सरदेसाई यांना विचारलं असता ते म्हणाले की, "लोकांनी ते पुस्तक वाचावं. पुस्तकात पूर्ण महाराष्ट्रात काय घटनाक्रम घडला तो त्यात आहे. छगन भुजबळ यांनीही स्पष्टीकरण दिलंय. जनतेनं पुस्तक वाचायला पाहिजे. राजकारणात मला काही रस नाही. पत्रकार आणि लेखक म्हणून जी वस्तुस्थिती मला दिसली ते पुस्तकात लिहिलं. ज्यांना राजकारण करायचं त्यांना करू द्या, मी त्यात पडणार नाही. माझ्या पुस्तकात एक चाप्टर महाराष्ट्रावर आहे. पुस्तक महाराष्ट्रावर नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मला भुजबळांबद्दल खूप आदर आहे. त्यांना अनेक वर्षांपासून मी ओळखतो. पुस्तकाचा एक पॅरेग्राफ वाचू नका. एका पॅरेग्राफवर राजकारण होतं, त्यामुळं पूर्ण पुस्तक वाचावं."
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आणि अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया (Source : ETV Bharat Reporter) पुस्तक व निवडणूक टाइमिंगचा काहीही संबंध नाही : "पुस्तक प्रकाशित करण्याचा टाइमिंग साधल्याचं वैगरे काही नाही. 2014, 2019 आणि 2024 च्या कालावधी हे पुस्तक लिहिलं," असं राजदीप सरदेसाई यांनी सांगितलं. पुस्तक आणि निवडणुक टाइमिंगचा काहीही संबंध नाही, असंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.
राजदीप सरदेसाईंच्या दाव्यांना अनिल देशमुखांचे समर्थन : "राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात जी माहिती दिली आहे, ती 100 टक्के खरी आहे. त्यात पूर्ण सत्यता आहे. ईडी आणि सीबीआयच्या दबावखाली कशा पद्धतीनं अनेकांना भाजपाच्या सरकारमध्ये सामील व्हावं लागलं, याची सर्वांना कल्पना आहे. छगन भुजबळ यांच्यावर दबाव होता. ते जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांना ईडीची नोटीस आली त्या वेळी त्यांची मानसिकता नव्हती की, पुन्हा एकदा सर्व चौकशीला सामोरं जायचं व पुन्हा जेलमध्ये जायचं. म्हणून सर्व लोकांनी भाजपा सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय केला," असं अनिल देशमुख म्हणालेत.
त्यावेळी भाजपाबरोबर गेलो असतो, तर मंत्री झालो असतो : अनिल देशमुख पुढे म्हणाले, "माझ्यावरही अशाच पद्धतीचा दबाव होता. मात्र मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं की, तुमच्या दबावाला मी जुमानत नाही. तुम्ही वाटल्यास ईडी, सीबीआयच्या मदतीनं मला जेलमध्ये टाका. मात्र, उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी अनिल देशमुख कधीही तुम्ही पाठवलेल्या शपथपत्रावर स्वाक्षरी करणार नाही. मी नकार दिलाच्या दुसऱ्या दिवशी माझ्या घरी सीबीआय आणि ईडी आली. मी पण यांच्याप्रमाणे भाजपाबरोबर गेलो असतो, तर आज मी मंत्री झालो असतो. मात्र, मला यांच्यासोबत जायचं नव्हतं म्हणून मला जेलमध्ये टाकलं."
हेही वाचा
- निवडणूक आयोगाला माहिती न देणाऱ्या शाळांवर कारवाई, अब्दुल सत्तार यांच्याशी संबंधित सर्वाधिक शाळा
- विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींचे ओबीसी कार्ड, तर भुजबळांनी कथित आरोप फेटाळले
- सत्तेच्या लोभापाई नेत्यांची जीभ घसरली, वैयक्तिक टीका करताना गाठली खालची पातळी, कोण आहेत ते नेते?