मुंबई -:सध्या सर्वत्र निवडणुकीच्या चर्चा सुरू आहेत. त्यातही मुंबईतील वरळी आणि माहीम विधानसभा मतदारसंघात काय होतं? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुंबईत असाच एक मतदारसंघ आहे, जिथे शिवसेना ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला लागलीय. खरं तर तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे विक्रोळी आहे. शिवसेना ठाकरे गटाची फायर ब्रँड तोफ असलेल्या संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सुनील राऊत मागील दोन टर्म या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आता त्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवार दिला असून, मनसेचे विश्वजित ढोलम निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
30 हजार मनसेचे ठरलेले मतदार:विक्रोळी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जातो. या मतदारसंघाचा इतिहास पहिला असता येथे शिवसेनेचे लीलाधर डाके तीन टर्म आमदार होते. त्यानंतर संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत मागील दोन टर्म इथे आमदार आहेत. इथे शिवसेनेची ताकद असली तरी 2009 पासून इथे मनसेचादेखील एक ठरावीक असा मतदार आहे. या विधानसभा मतदारसंघातील मनसेच्या मतांचा विचार केला असता इथे साधारण 30 हजार मनसेचे ठरलेले मतदार आहेत. आता शिवसेनेत दोन गट पडल्याने शिवसेनेच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे मनसेला ही एक संधी वाटत असली तरी मनसेसमोर देखील काही आव्हान आहेत. ही आव्हान मनसेचे उमेदवार विश्वजित ढोलम कसे पार करतात हे निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.
विक्रोळीत आरोग्य सुविधाच नाही- ढोलम: या संदर्भात विश्वजित ढोलम यांनी 'ईटीव्ही भारत'ला विशेष मुलाखत दिलीय. या मुलाखतीत बोलताना ढोलम म्हणाले की, "विक्रोळीतील जनतेचे प्रश्न मागील वर्षानुवर्ष सुटलेले नाहीत. इथे आरोग्य सुविधाच नाही. विक्रोळीत पालिकेचे ज्योतिबा फुले हॉस्पिटल आहे. मात्र, ते सुस्थितीत नाही. विक्रोळीत एखादा माणूस गंभीर आजारी पडला तर त्याला उपनगरातून मुंबईत यावं लागतं. अशातच आता नव्याने येऊ घातलेला धारावी पुनर्विकास प्रकल्पातील धारावीकरांचे पुनर्वसन आमच्या मुलुंड आणि विक्रोळी भागात केले जाणार आहे, ज्याला आमचा विक्रोळीवासीयांचा विरोध आहे. महाराष्ट्र निर्माण सेना याबाबतीत विक्रोळीतील जनतेच्या मागे असून, आम्ही इथे पुनर्विकासाचे कॅम्प लावू देणार नाही," अशी भूमिका विश्वजित ढोलम यांनी मांडली आहे.