मुंबई Maharashtra Weather Updates :राज्यातील अनेक शहरांना पावसाचा मोठा फटका बसला (Mumbai Rain Updates) आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अतिमुसळधार पाउस झालाय. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालंय. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ (Source - ETV Bharat Reporter) मुंबईत मुसळधार पाऊस : मुंबईमध्ये रविवारी रात्रीपासून धुवाधार सुरू असलेल्या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं असून, सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहन केलं.
रस्ते आणि रेल्वे सेवेला फटका : मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या 24 तासात 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं असून, उपनगरीय रेल्वे सेवा कोलमडली आहे. तर लांब पल्ल्याच्या गाड्याही रेल्वे रुळांवर अडकून पडल्या आहेत. रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. तर दादर, वडाळा, सांताक्रुज, अंधेरी, भांडुप या ठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे.
मुख्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन : या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांना आवाहन केलंय. मुंबईत सर्वत्र पाऊस झाल्यामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे मार्गावरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून, लवकरच रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्याचं प्रयत्न सुरू आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश आपण दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.
अजित पवारांचं नागरिकांना आवाहन : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नागरिकांना आवाहन केलं. रविवारी रात्री मुंबईत सहा तासांमध्ये 300 मिमी पाऊस पडला आहे. हा मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो, त्याच्या १० टक्के पाऊस आहे. भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. वर्षातील 365 दिवस दुष्काळ, पूर, वादळ यांचा सामना करण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलली पाहिजे. त्यासोबतच अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
रायगड किल्ला पर्यटकांकरिता बंद :रायगड किल्ला परिसरात रविवारी संध्याकाळपासून ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे किल्ल्यावरून खाली पडणाऱ्या पाण्यानं रौद्ररूप घेतले. अनेक पर्यटक पायरी मार्गानं परतत असताना पर्यटकांची तारांबळ उडाली आहे. महादरवाजाच्या मार्गांवर गुडघाभर पाणी जमा झाले. पर्यटकांची सुटका करण्यता आली असून सुदैवानं कोणतीही जीवित हानी नाही. रायगड जिल्ह्यातील सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आजपासून रायगड किल्ला पर्यटकांकरिता बंद करण्यात आलेला आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला. किल्ले रायगडावर असलेले पर्यटक यांना रोपवे पुढील आदेशपर्यंत बंद करण्यात येणार आहे. रोप वे प्रशासनाकडून किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे बंद करण्यात आला.
रिल्स बनवण्याचा धोका पत्करू नये-मंत्री उदय सामंत यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत अलिबाग, मुरुड तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटेल, " जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. पावसाची शक्यता लक्षात घेवून प्रशासन अलर्ट मोडवर आहे. रायगडावरील पायऱ्यांवरून वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे काही पर्यटक अडकल्याची दृश्ये चिंताजनक आहेत. गड-किल्ले भेटींचा आस्वाद घेत असताना तज्ज्ञांच्या सल्ल्याने पर्यटन करण्याची काळजी घ्यावी. पर्यटकांना मार्गदर्शन आणि संकटकाळात मदत करण्यासाठी प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पाण्याचा वेग आणि निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेता पर्यटकांनीही अतिसाहसी करू नये. पाण्याचा प्रवाह अचानक वाढण्याची शक्यता असल्याने रिल्स बनवण्याचा धोका पत्करू नये. रायगड-रत्नागिरी भागातील अतिवृष्टी आणि नद्यांतील पाण्याच्या पातळीबद्दल प्रशासनाकडून सातत्याने माहिती घेत आहे. सर्व परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास SDRF च्या तुकड्यांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोकणात ऑरेंज अलर्ट :रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुरसदृश स्थिती निर्माण झालीय. हवामान विभागात सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळं येथील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 305 मीमी पावसाची नोंद झालीय. कोल्हापूरात जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पाऊस सुरू आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्यानं वाढ होत आहे. गगनबावडा येथे सर्वाधिक 194 मिमी पावसाची नोंद झालीय.
हेही वाचा
- मुंबईत सहा तासात 300 मिलिमीटर पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर - Mumbai Rain
- पंचगंगा नदी इशारा पातळी गाठायला 'इतके' फूट बाकी; तब्बल 38 बंधारे पाण्याखाली - Panchganga River
- शहापूर तालुक्यात पुराचं थैमान, पुरामध्ये अडकलेल्या दिडशेहून अधिक पर्यटकांना एनडीआरएफच्या पथकानं वाचवलं; शेकडो घरं पाण्याखाली - Heavy Rain in Thane