मुंबई Rahul Narwekar Uddhav Thackeray : पक्षांतर बंदी कायद्याबाबत पुनर्विचारा संदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, नार्वेकरांच्या निवडीवर विरोधकांकडून तीव्र आक्षेप नोंदवला जातोय. उद्धव ठाकरे यांनी, ही निवड देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेनं टाकलेलं पुढचं पाऊल मानायचं का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. याला टोला लगावत, उद्धव ठाकरे यांचं माझ्यावरील प्रेम जगजाहीर असून त्यांच्या शुभेच्छांचा मी स्वीकार करत असल्याचं राहुल नार्वेकर म्हणाले.
उद्धव ठाकरेंना राज्याबद्दल अस्मिता नसावी : "देशातील सर्व पीठासीन अधिकाऱ्यांचं संमेलन झालं होतं. या संमेलनात शेड्युल 10 साठी आणखी स्पष्टता यावी या संदर्भात चर्चा झाली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एक समिती गठन करण्याचं ठरवलं आणि त्या समितीत माझी नियुक्ती करण्यात आली. या समितीमध्ये आपल्या राज्यातील सदस्य आहे ही अभिमानाची बाब असली पाहिजे. मात्र त्यांना (उद्धव ठाकरे) आपल्या राज्याबद्दल अस्मित नसावी", असा टोला राहुल नार्वेकरांनी लगावला.
वैयक्तिक टीका करण्यापेक्षा कामाबद्दल बोला : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना राहुल नार्वेकर म्हणाले की, वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मी केलेल्या कामाबद्दल बोलण्याची धमक असेल तर ते जास्त चांगले होईल. मी दिलेल्या निर्णयात कायदेशीररित्या काय चुकीचं आहे हे दाखवण्याची धमक जितेंद्र आव्हाड किंवा उद्धव ठाकरे यांच्यात नाही. तर संजय राऊत यांचा काही प्रश्नच उद्भवत नाही, असं राहुल नार्वेकर म्हणाले.
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी आज (29 डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयानं राहुल नार्वेकरांच्या मागणीनुसार आणखी 15 दिवसांची मुदतवाद दिली आहे. त्यानुसार आता 15 फेब्रुवारीला यावर निकाल येईल, असं राहुल नार्वेकरांनी सांगितलं.
हे वाचलंत का :
- 'माकडाच्या हाती कोलित दिलं'; पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांच्या निवडीवर विरोधक पडले तुटून
- "हा तर देशातील सर्वात मोठा फ्रॉड", राहुल नार्वेकरांवर संजय राऊतांचा हल्लाबोल
- पक्षांतरबंदी कायदा पुनर्विचार समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरच का?