मुंबई Anti Defection Law Committee :पक्षांतर बंदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एक समिती गठित केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली. मात्र नार्वेकर यांच्या निवडीवरून विरोधकांनी हल्लाबोल करण्यास सुरुवात केलीये. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या मुद्द्यावरून राहुल नार्वेकर आणि ओम बिर्ला यांच्यावर जोरदार टीका केली.
विरोधकांची जोरदार टीका : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत पक्षावरच आपला दावा ठोकला. यानंतर राज्यात पक्षांतर बंदी कायद्याची चर्चा सुरू झाली. या प्रकरणी राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूनं दिल्यानंतर विरोधकांनी त्यांचावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. अशा स्थितीत पक्षांतर बंदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड केल्यानं यावरून विरोधकांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे.
उद्धव ठाकरेंची टीका : देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नेमणूक करण्यात आली. हे म्हणजे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेनं टाकलेलं पुढचं पाऊल मानायचं का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय. "महाराष्ट्रात नुकताच परिशिष्ट दहाच्या चिंधड्या उडवून जो उरफाटा निर्णय नार्वेकरांनी दिला त्याचं वस्त्रहरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तर केलेच; परंतु त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातही गेलो आहोत", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या निर्णयावरून टीका केली.
ओम बिर्लांनी माकडाच्या हाती कोलित दिलं : याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "ज्या माणसानं आतापर्यंत दहा वेळा पक्षांतर केलं, त्या माणसाकडेच ओम बिर्ला यांनी पक्षांतर बंदी कायद्याची जबाबदारी सोपवली". खासदार विनायक राऊत म्हणाले की, या समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड करून ओम बिर्ला यांनी माकडाच्या हाती कोलित दिलंय. "बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची नसल्याचं नार्वेकर सांगतात. ती व्यक्ती पक्षांतर बंदी कायद्यावर कशाप्रकारे निर्णय घेऊ शकते", असा सवालही विनायक राऊतांनी उपस्थित केला आहे. लोकसभा ओम बिर्ला यांनी ही जबाबदारी नार्वेकर यांच्याकडे सोपवून संविधानाचा अपमान केल्याची टीका त्यांनी केली.
संवैधानिक मूल्यांची थट्टा : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील या निवडीवर टीका केली आहे. "पक्षांतर बंदी कायदा संदर्भातील समितीवर राहुल नार्वेकर यांची निवड होणं यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते", असं ते म्हणाले. जी व्यक्ती स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तत्व आणि नैतिकतेला मुठमाती देते, त्या व्यक्तीची या पदी निवड करणं म्हणजे संवैधानिक मूल्यांची सर्वात मोठी थट्टा असल्याचंही आव्हाड म्हणाले.
राहुल नार्वेकरांचा निकाल स्क्रिप्टेड होता : याबाबत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, यापूर्वी राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबद्दल घेतलेला निर्णय स्क्रिप्टेड होता. दिल्लीत जे सरकार बसलं आहे त्यांचा हा प्लान होता. देशात महाराष्ट्रील लोकशाही परंपरेचं आणि विधिमंडळाच वेगळं महत्त्व आहे. परंतु या निर्णयानं या परंपरेचं मातीमोल झाल्याची टीका नाना पटोलेंनी केली.
हे वाचलंत का :
- "हा तर देशातील सर्वात मोठा फ्रॉड", राहुल नार्वेकरांवर संजय राऊतांचा हल्लाबोल
- पक्षांतरबंदी कायदा पुनर्विचार समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरच का?