नागपूर :ओबीसी युवा अधिकार मंचतर्फे संविधान सन्मान संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. सुरेश भट सभागृहात उद्या 11 ते 2 वाजताच्या दरम्यान संविधान सन्मान संमेलन होणार असून राहुल गांधी त्यामध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. मात्र, हा मर्यादित कार्यक्रम असल्यानं या संमेलनात प्रसारमाध्यमांना परवानगी नाकारण्यात आली आहे.
संविधान सन्मान संमेलनात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात अनेक बुद्धिजीवी उपस्थित राहणार आहेत. भारताचे संविधान हेच सर्वोच्च आहे. मनुस्मृती विरोधात काँग्रेसची लढाई सुरुच आहे, त्यामुळं संविधान वाचविण्यासाठी लढा उभारणं काळाची गरज आहे. हा लढा अधिक बुलंद करण्यासाठी विदर्भातील सामाजिक संस्थानी नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात संविधान संमेलनाचं आयोजन केलं आहे. "संविधान सन्मान संमेलनाचं लाईव्ह फीड काँग्रेसचं सोशल मीडिया हँडल आणि यूट्यूबच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांना उपलब्ध होईल," असं काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितलं.
अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter) दीक्षाभूमीला जाणार :उद्या दुपारी बाराच्या सुमारास नागपुरात दाखल झाल्यानंतर राहुल गांधी या संमेलनात सहभागी होतील. मात्र, त्यापूर्वी ते दीक्षाभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेऊन वंदन करणार आहेत.
कार्यक्रम पूर्णतः अराजकीय : संमेलनात मनुवाद, संविधान, मनुस्मृती महिलांचं स्थान काय, शिवशाही आणि मनुस्मृतीमध्ये किती फरक आहे यावर चर्चा होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. "नागपूर येथे होणाऱ्या संविधान संमेलनाचं निमंत्रण राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी स्वीकारलं आहे. या संमेलनात विदर्भातील विविध संस्था सहभागी होणार आहेत. ओबीसी युवा मंच यांनी संमेलनाचं निमंत्रण दिलं होतं. उमेश कोर्राम आणि अनिल जयहिंद यांच्या पुढाकारानं कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटना कार्यक्रमात सहभागी असतील. हा पूर्णतः अराजकीय कार्यक्रम आहे. कार्यक्रमाला राजकीय स्वरूप नाही. आदर्श आचारसंहितेचं पालन करूनच कार्यक्रम होणार," असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
लोकांच्या मनात भीती : "अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे धडे दिले जाणार आहेत, हा देशाला मोठा धोका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान बदलण्याचा डाव आहे. संविधानानं आपलं रक्षण केलं आहे. देशातील प्रत्येक माणसाला संविधानामुळं हक्क मिळाले. आता संविधान बदलून मनुस्मृती आणली, तर काय होईल ही भीती लोकांच्या मनात आहे," असं कार्यक्रमाचे आयोजक अनिल जयहिंद म्हणाले आहेत.
हेही वाचा
- लोकसभेपेक्षा विधानसभेत चित्र वेगळं असेल, भाजपा नेते डॉ. भागवत कराड यांना विश्वास
"...तरीही विजय आमचाच, दबावाला बळी न पडता निवडणुकीला सामोरे जाणार"; सदा सरवणकरांचा निर्धार - भिवंडीत वाहन तपासणीवेळी आढळली २ कोटी ३० लाख रुपयांची रोकड, भरारी पथकानं केली जप्त