नागपूर-लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, "संविधान फक्त पुस्तक नाही तर जगण्याचा अधिकार आहे. संविधान सर्वांना अधिकार देते. ते संविधानावर थेट हल्ला करत नाहीत, लपून हल्ला करतात. एक व्यक्ती देशाचं भवितव्य हिसकावून घेईल, असे संविधानात लिहिले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोट्यवधी लोकांचा आवाज होते. गांधी आणि आंबेडकर यांच्या मुखातून जनतेचा आवाज निघायचा. जाती आधारित जनगणना झाली पाहिजे. जातीगणनेचं खरं नाव हक्क आहे. संविधान नसते, तर निवडणूक आयोगही राहीला नसता. सामान्याला सत्ता, शक्तीची गरज आहे. सत्तेशिवाय सन्मान मिळणार नाही."
" संविधानात भगवान बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा बसवेश्वर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रिबाई अशा महापुरुषांचा आवाज आहे. संविधानातील विचार हजारो वर्षांपूर्वीचे आहेत. संविधानात सर्व जाती, धर्माचा, प्रदेशाचा आदर आहे. याच संविधानावर भाजपा व आरएसएस सातत्याने हल्ले करत आहेत. आरएसएस संविधानावर थेट हल्ला करु शकत नाहीत, ते लपून हल्ला करतात, आरएसएसमध्ये हिंमत असती तर त्यांनी समोरुन हल्ला केला असता, असा घणाघाती हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तोफ डागली-नागपूरमध्ये संविधान सन्मान संमेलनात बोलताना राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तोफ डागली. ते पुढे म्हणाले, " डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी हे स्वतःबद्दल बोलत नसत, ते जेव्हा बोलायचे तेव्हा तो कोट्यवधी लोकांचा आवाज असायचा. संविधानात सर्वांच्या विकासाबद्दल लिहिले आहे. संविधानामुळे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, आयआयटी, आयआयएम, सार्वजनिक रुग्णालये आहेत. निवडणूक आयोग, सरकारी यंत्रणा आहेत. संविधानात एक व्यक्ती एक मतदान, प्रत्येक जात, धर्म, प्रदेशाचा आदर केला आहे. पण देशात ९० टक्के लोकांवर दररोज अन्याय होत आहे. त्याविरोध आपली लढाई आहे."
५० टक्क्यांची मर्यादासुद्धा हटवली जाईल-"अन्याय दूर करण्यासाठी जातनिहाय जनगणना गरजेची आहे. जातनिहाय जनगणनेची मागणी होत असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची झोप उडाली आहे. जातनिहाय जनगणनेवर मी बोलतो तेव्हा नरेंद्र मोदी माझ्यावर देश तोडण्याची भाषा करतो असा आरोप करतात. जातनिहाय जनगणनेवर काय भूमिका घ्यायची यावर आरएसएसमध्येही मंथन सुरू आहे. त्यांनी कोणतीही भूमिका घेतली तरी जातनिहाय जनगणना करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादासुद्धा हटवली जाईल," असा निर्धार राहुल गांधी यांनी व्यक्त केला.