पुणेTerrorist Attack Possibility Pune : देशभरात सुरक्षेच्या दृष्टीनं कारवाई केली जात असून विविध संघटनेत राहून दहशतवादी संघटनांसाठी काम करणाऱ्या लोकांना अटक देखील केली जात आहे. असं असताना पुण्यातील एका नामांकित हॉटेलला दहशतवाद्यांपासून धोका असल्याचं सांगत या हॉटेलला पुणे पोलीस आयुक्तांनी पत्र लिहून हा धोका कळवला आहे.
पोलिसांकडून सुरक्षेचा मुद्दा उपस्थित :पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्राद्वारे ही भीती व्यक्त केली आहे. सतत गर्दी होत असल्यामुळे "या" हॉटेलला पुणे पोलिसांनी अनेक नोटीस बजावल्या होत्या; पण हॉटेल व्यवस्थापन कोणत्याही नोटीसला उत्तर देत नव्हतं. परिणामी, हॉटेलमधील 'डिस्को थेक' बंद करण्याबाबत 'कारणे दाखवा' नोटीस देत सुरक्षेचा मुद्दा आता पोलिसांनी उपस्थित केला आहे.
गर्दीचं ठिकाण दहशतवाद्यांचं लक्ष्य :याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कल्याणी नगर भागात असलेल्या एका नामांकित हॉटेलला पुणे पोलिसांनी त्या ठिकाणी असलेले 'डिस्को थेक' बंद करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी दिलेल्या या पत्रामध्ये सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. या हॉटेलमध्ये लोक दारू पिऊन धिंगाणा करीत असतात. सध्या दहशतवादी कारवायाबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. एखादी दहशतवादी संघटना गर्दीचं ठिकाण लक्ष्य करून बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून आणू शकतात. यातून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी यातून दिला आहे.