पुणे Pune Police Bust Drug Racket :ड्रग्ज विक्रीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आलंय. पुण्यात सापडलेल्या ड्रग्जची विक्री देशातील विविध भागात तसंच परदेशात होणार होती, अशी माहिती आता समोर आलीय. 19 फेब्रुवारीला पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई करत तीन ड्रग्ज पेडलरला अटक केली होती. त्यावेळी त्यांच्याकडून चार कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं होतं. आता त्या आरोपींच्या घराची झडती घेतली असता, तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज आढलून आलंय.
पुणे पोलिसांची कारवाई :पुणे पोलिसांनी 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचं ड्रग्ज जप्त केलंय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केलेल्या या कारवाईत 52 किलो पेक्षा अधिक मेफेड्रॉन (एमडी- Mephedrone) आढळून आलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात एका किलो एमडीची किंमत 2 कोटी रुपये आहे. हे पकडलेलं एमडी ड्रग्ज मुंबईला पाठवण्यात येणार होतं, अशी माहिती समोर येत आहे.
सोमवारीसुद्धा केली होती कारवाई :पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सोमवारी 3 जणांना अटक केली होती. वैभव माने, अजय कारोसिया, हैदर शेख असे या तीन आरोपींची नावे आहेत. यातील माने आणि हैदर यांच्याविरोधात ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी याआधीही गुन्हे दाखल आहेत. वैभव माने आणि हैदर शेख हे मागील वर्षी येरवडा कारागृहातून बाहेर आले आहेत. तेव्हापासून या दोघांनी ड्रग्जची विक्री करण्यास पुन्हा सुरुवात केली असल्याची माहिती मिळत आहे.
पत्र्याच्या गोडाऊनमध्ये ठेवलं होतं ड्रग्ज : याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी हैदर शेखची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर तो राहत असलेल्या विश्रांतवाडी येथे पोलिसांकडून झडती घेतली असता, त्याच्या घरातून क्रिस्टल पावडर स्वरुपातील ५०० ग्रॅम एमडी मिळून आलंय. तसंच त्याच्या झाडाझडतीमध्ये एक चावी आढळून आली होती. चावीबाबत त्याच्याकडं अधिक तपास केला असता, ती चावी विश्रांतवाडी परिसरात असलेल्या एका पत्र्याच्या गोडाऊनची असल्याचं समजलं. तिथंही पोलिसांनी छापा टाकला.