कोल्हापूर : वधू- वर नोंदणी संकेतस्थळावर लग्न करू इच्छिणाऱ्या तरुणींशी ओळख वाढवून लग्नाचं अमिष दाखवत लैंगिक अत्याचार करणाऱ्या भामट्याला कोल्हापूर पोलिसांनी अखेर अटक केली. पुण्यातील फिरोज निजाम शेख असं या तरुणाचं नाव असून फसवणूक झालेल्या महिलांनी कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केलं आहे.
घटस्फोटीत महिलेला लावला लाखोचा चुना :पुणे कॅम्प येथे राहणाऱ्या फिरोज निजाम शेख या तरुणानं एका वधू वर नोंदणी संकेतस्थळावर स्वतःचा बायोडेटा अपलोड करून लग्नासाठी मुलींचा शोध घेत असल्याचं भासवत होता. कोल्हापूर जिल्ह्यातील एका घटस्फोटीत महिलेला दुसरं लग्न करायचे असल्याने तिने आपला बायोडेटा संबंधित नोंदणी संकेतस्थळावर अपलोड केला. यावरून फिरोज शेखने या महिलेचा मोबाईल नंबर मिळवून तिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तो कोल्हापुरात येऊन या महिलेस आणि तिच्या नातेवाईकांना भेटला. त्यांनी आपण उच्चशिक्षित असून इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगितलं. या महिलेच्या कुटुंबाला खोटी माहिती सांगून त्याने या सर्वांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने सतत महिलेशी मोबाईलवर संपर्क साधला. वरचेवर कोल्हापुरात येऊन तिची भेट घेऊ लागला. महिलेचा विश्वास संपादन करत तिच्याकडील 11 तोळे दागिने आणि 1 लाख 69 हजारांची शेख याने उकळले. यानंतर मात्र फिरोज शेख हा या महिलेचे फोन घेण्यास टाळाटाळ करू लागला. यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिरोज शेख विरुद्ध तक्रार नोंदवली. कोल्हापूर पोलिसांनी पुण्यात जाऊन फिरोज शेख याला ताब्यात घेऊन अटक केली.
मुंबईतील महिलेची फसवणूक केल्याचं समोर :मोबाईल वरून सोशल मीडिया साईट्स आणि संकेतस्थळावर लग्नाचा बायोडाटा अपलोड करून फिरोज शेख याने मुंबईतील एका महिलेची अशाच पद्धतीनं फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. सध्या सर्वत्र लग्नाचा सिझन सुरू असल्यानं अनेक नववधू आणि वर सोशल मीडिया आणि संकेतस्थळांचा वापर करत आहेत. मात्र या पद्धतीने शेख याने महिलेची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी "राज्यात अन्य कुणाची फसवणूक झाली असेल, तर तत्काळ कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधावा," असं आवाहन केलं आहे.
शारीरिक शोषण करुन लुटलं :कोल्हापूरच्या पीडित महिलेला आपल्या जाळ्यात ओढून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करत पीडितेला लुटलं. या नराधमानं मला ब्रेन ट्यूमर झाला आहे, उपचारासाठी पैसे हवे आहेत, असं कारण त्यानं सांगितलं. तसेच माझ्या घरावर प्राप्तिकर विभागाची कारवाई झाली आहे, या प्रकरणातून बाहेर येण्यासाठी मला पैशांची गरज आहे, असं सांगत शेख यानं या महिलेला वेळोवेळी फसवलं. सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 10 लाखांचा गंडा घातल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.