पुणे Pune Hit and Run Accident : पुण्यातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणी पोलिस आयुक्तांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय. तपासात दिरंगाई केल्याचा आणि अपघाताची माहिती वरिष्ठांना वेळेत न दिल्याचा ठपका ठेवत या दोघांचं निलंबन करण्यात आलंय. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी या दोघांची नावं आहेत.
अल्पवयीन मुलाच्या वडिलांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील त्या अल्पवयीन मुलाचे वडील तसेच पब चालक आणि मॅनेजर यांना शुक्रवारी पुणे पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर विशाल अग्रवाल यांच्यासह पब मालक आणि मॅनेजर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय. कल्याणी नगर अपघात प्रकरणात त्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगर इथून पोलिसांनी अटक केली होती. तर अल्पवयीन मुलाला मद्य पुरवण्याची परवागणी दिल्याप्रकरणी प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर, संदीप सांगळे, नितेश शेवाणी आणि जयेश गावकर यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यावर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय.
सरकारी वकिलांनी काय बाजू मांडली : न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी वकील म्हणाले की, "विशाल अग्रवाल यांच्या घरातील सीसीटीव्ही जप्त करण्यात आलंय. मात्र त्याच्याशी छेडछाड करण्यात आलीय. अल्पवयीन मुलानं 48 हजार रुपयांचं बिल भरलं त्याच्या बॅंक अकाउंटचे डिटेल्स आरोपींकडून देण्यात आलेले नाहीत. आरटीओकडे वाहनाची नोंद पुर्ण न करता कार वापरण्यात आली असून अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या सोबतच्या दोन मुलांनी दारुसोबत आणखी कोणत्या गोष्टींचं सेवन केलं का याचा तपास करण्याची गरज आहे. यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात यावी."
दोन्ही बाजुंचा युक्तिवाद एकल्यावर न्यायालयाचा निर्णय : यावर आरोपी विशाल अग्रवाल यांचे वकील प्रशांत पाटील म्हणाले की, "फसवणूकीचा गुन्हा विनाकारण दाखल करण्यात आलाय. केवळ आरटीओकडं सोळाशे रुपये भरले नाहीत म्हणून 420 चा फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशाल अग्रवालकडे आधीच तपास झालेला आहे. सर्व आवश्यक गोष्टी ताब्यात घेतलेल्या आहेत. त्यामुळं पोलीस कोठडीची गरज नाही." दोन्ही पक्षाच्या सुनावणीनंतर न्यायालयाने सर्व सहा आरोपींची पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली आणि सर्व आरोपींना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे आरोपी जामीन मिळवण्यासाठी अर्ज करू शकणार आहेत.
हेही वाचा :
- ड्रायव्हर गाडी चालवत होता हे दर्शवण्याचा प्रयत्न, पण गाडी अल्पवयीन मुलानेच चालवली - पुणे पोलीस आयुक्त - Pune Hit And Run Case Update