पुणे : शिक्षणाचं माहेर घर असणाऱ्या पुण्यातील खडकी इथल्या पोलीस निरीक्षकानं टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं. ही माहिती समजताच पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. मावळ भागातील लोणावळा इथं पुणे पोलीस आयुक्तलयातील पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी आत्महत्या केली. गुंजाळ हे खडकी पोलीस ठाण्यात तपास पथकाचे अधिकारी होते. तीन दिवसांपासून गुंजाळ गैरहजर होते. त्यांचा फोन देखील लागत नव्हता. आज त्यांचा शोध लागला असता, त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं.
आत्महत्येच कारण अस्पष्ट : लोणावळा शासकीय रुग्णालयात गुंजाळ यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी त्यांची गाडी आढळून आली. या गाडीमध्ये एक डायरी आढळून आली आहे. तर, आत्महत्येचं नेमक कारण काय? हे अस्पष्ट आहे. सध्या घटनास्थळी खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलपगारे आणि पथक दाखल झालं असून पुढील तपास करत आहेत.