अमरावतीStone Pelting In Amaravati :अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यात येणाऱ्या पांढरी खानापूर या गावात प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी करण्यासाठी गत दहा दिवसांपासून ग्रामस्थ आंदोलन करीत आहेत. आठ दिवसांपूर्वी पांढरी खानापूर येथील ग्रामस्थ आपलं गाव सोडून अमरावती शहरात दाखल झाले. दरम्यान गावातील प्रवेशद्वारावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासंदर्भात प्रशासनाच्या वतीनं सर्व बाजूंनी विचार केला जात होता. आज पांढरी खानापूर येथील ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील विविध भागातून मोठा जमाव विभागीय आयुक्तालयावर धडकला.
जमावाचा पोलिसांवर हल्ला :अमरावती शहर आणि ग्रामीण पोलिसांच्यावतीनं दिवसभर या जमावाला समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास जमावानं विभागीय आयुक्तालयावर प्रचंड प्रमाणात दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता जमावानं पोलिसांवर देखील हल्ला चढवला.
विभागीय आयुक्तालय परिसरात दहशत :विभागीय आयुक्तालयावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आल्यामुळे येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. पोलिसांच्यावतीनं जमावावर अश्रुधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्यानं याचा धूर विभागीय आयुक्तालय परिसरात पसरला आहे. विभागीय आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आपापल्या दालनात स्वत:ला कोंडून घेतलं आहे.
रस्त्यावर दगडांचा खच :या दगडफेकी दरम्यान पोलिसांच्या अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. विभागीय आयुक्तालया बाहेर उभे असणाऱ्या पोलिसांच्या जवळपास सर्वच गाड्यांवर तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकी बाहेर उभ्या असणाऱ्या सर्वच गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. विभागीय आयुक्तालयाच्या परिसरातील दुचाकींची देखील तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर विभागीय आयुक्तांना समोर मुख्य मार्गावर दगडांचा खच लागला होता.