मुंबई Devendra Fadnavis On MVA Protest :महाविकास आघाडीच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याप्रकरणी मुंबईत सरकार विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. मात्र महाविकास आघाडी कधीच छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान करत नाही. महाविकास आघाडीकडून करण्यात येत असलेलं आंदोलन हा केवळ राजकारणाचा भाग आहे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
महाविकास आघाडीचं आज गेट वे ऑफ इंडियाजवळ आंदोलन :मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात मोठं राजकारण पेटलं आहे. महाविकास आघाडीच्या वतीनं या प्रकरणी राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. आज महाविकास आघाडीच्या वतीनं मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ सरकार विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, संजय राऊत, वर्षा गायकवाड, खासदार शाहू महाराज, खासदार सुप्रिया सुळे आदी नेते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. महाविकास आघाडीच्या वतीनं गेट वे ऑफ इंडिया परिसरात मोठी घोषणाबाजी करण्यात आली.