महाराष्ट्र

maharashtra

मुंबईतील 'या' धोकादायक पुलांवरून नाचत विसर्जन मिरवणूक नेण्यास मनाई - Mumbai Ganpati Visarjan

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2024, 9:14 PM IST

Mumbai Ganpati Visarjan 2024 : यंदा गणेश विसर्जन (Ganpati Visarjan) मंगळवारी, 17 सप्टेंबर रोजी आहे. त्यादिवशी अनंत चतुर्दशी साजरी केली जाते. तर गणपती विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच मुंबईतील १३ उड्डाणपुलावरून नाचत गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे.

Mumbai Ganpati Visarjan 2024
मुंबई गणपती विसर्जन (ETV BHARAT Reporter)

मुंबई Mumbai Ganpati Visarjan 2024 : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या, गणपती उत्सवाची सांगता गणपती विसर्जनाने (Ganpati Visarjan) होणार आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात होणारे विसर्जन आणि दुसऱ्या दिवशी येणारी ईद-ए-मिलाद पाहता मुंबई पोलीस सुरक्षा व्यवस्थेबाबत हाय अलर्टवर आहेत. मुंबईतील १३ उड्डाणपुलावरून नाचत गणपती विसर्जन मिरवणुकीस मनाई करण्यात आली आहे. या पुलांवरून केवळ विसर्जन मिरवणूक १०० जणांसह शांततेत काढण्याचं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

या पुलांवरून विसर्जन मिरवणूक नेण्यास मनाई : १३ उड्डाणपूलांमध्ये घाटकोपर, करी रोड, आर्थर रोड (चिंचपोकळी), भायखळा, मरीन लाईन्स, सँडहर्स्ट रोड, केनेडी, फॉकलँड, मुंबई सेंट्रल येथील बेलासिस, महालक्ष्मी, प्रभादेवी स्टेशन आणि दादर टिळक उड्डाणपूलाचा समावेश आहे.

प्रतिक्रिया देताना सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी आणि अनिल कुंभारे (ETV BHARAT Reporter)


सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे ठेवणार नजर : 10 हजारहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवलं जाणार असल्याची माहिती, मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. संपूर्ण मुंबईत आधीच बसवलेल्या 5 हजार 500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांव्यतिरिक्त, विसर्जनासाठी आणखी 3,500 कॅमेरे जोडण्यात आले आहेत. हे कॅमेरे गिरगाव चौपाटी, जुहू बीच, वर्सोवा बीच आणि मढ आयलंड यांसारख्या संवेदनशील आणि गर्दीच्या भागांवर बारीक नजर ठेवण्यास पोलिसांना मदत करतील. शिवाय, मुंबई वाहतूक पोलीस त्यांच्या 1 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण विसर्जन प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत. ज्यात वाहनांचा मागोवा घेण्यासाठी 56 ARNC (ऑटोमॅटिक रेकग्नाइज्ड नंबर कॅमेरा) युनिट्सचा समावेश आहे.



३० हजार हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात : सीसीटीव्ही कॅमेऱ्याशिवाय विसर्जनाच्यावेळी सुरक्षेसाठी ३० हजार हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. या सुरक्षा दलात 9 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 40 पोलीस उपायुक्त , 56 सहाय्यक पोलीस आयुक्त, 4 हजार पोलीस अधिकारी, 20 हजार पोलीस हवालदार, 1 हजार होमगार्ड आणि SRPF (राज्य राखीव पोलिस दल) च्या 10 कंपन्या समाविष्ट आहेत. विशेषत: महिलांच्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी पाचशे मोबाईल व्हॅन आणि चारशे बीट मार्शल सतत गस्त घालणार आहेत. याव्यतिरिक्त, गिरगाव, जुहू बीच आणि इतर प्रमुख विसर्जन स्थळाच्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलीस ड्रोन देखील आणणार आहेत.


नियमांचं पालन करण्याच्या दिल्या सूचना : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 10 हजार सार्वजनिक गणपती मूर्ती असून सर्व आयोजकांना विसर्जनाच्यावेळी नियमांचं पालन करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. विसर्जन दरम्यान वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी, संपूर्ण शहरात 2,500 वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्यासह वाहतूक सहआयुक्त अनिल कुंभारे यांनी अनंत चतुर्थीच्या दिवशी तैनात करण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताची माहिती दिली.

हेही वाचा -

  1. अनंत चतुर्दशीच्या दिवशी 'या' शुभ मुहूर्तावर करा गणेश विसर्जन; अन... भगवान विष्णूच्या अनंत रुपाची करा पूजा - Anant Chaturdashi 2024
  2. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला 'अशी' होणार सुरवात, मानाच्या गणपती मंडळात 'ही' पथके होणार सहभागी - Pune Ganesh Visarjan

ABOUT THE AUTHOR

...view details