मुंबई Mumbai Crime : पैसे भरायला एटीएमवर गेलेल्या वकिलाला भामट्यांनी लाखो रुपयाचा गंडा घातल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना खार परिसरातील एका एटीएमसमोर घडली. तौसीफ शेख असं भामट्यांनी गंडा घातलेल्या वकिलाचं नाव आहे. या प्रकरणी खार पोलिसांनी दोन भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीला लवकरच बेड्या ठोकण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पैसे भरायला एटीएमवर गेलेले वकिलाला घातला गंडा :वांद्रे इथले अॅड. तौसीफ शेख (वय 37) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. वकील असलेले शेख यांनी तक्रारीत नमूद केलं आहे की, त्यांचे नातेवाईक पर्यटन, विमान तिकीट, रेल्वे तिकीट, पैशांची देवाणघेवाण या व्यवसायात गुंतलेले आहेत. हस्तांतरणासाठी गोळा केलेला निधी कंपनीच्या खात्यात जमा केला जातो. शनिवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास, तक्रारदाराच्या भावानं त्यांना दोन ग्राहकांच्या खात्यात 5.70 लाख जमा करण्यासाठी सोपवले होते. शेख यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला. रविवारी सकाळी एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या एटीएम मशीनद्वारे ग्राहकाच्या खात्यात 70 हजार जमा करण्यात आले. मात्र, उर्वरित 5 लाख रुपये दुसऱ्या बँकेत जमा करण्यासाठी शेख बाहेर पडले तेव्हा, दोन अज्ञात व्यक्तींनी एटीएमच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांच्याशी संपर्क साधला.