सातारा ANS CHALLENGE TO ASTROLOGERS: सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. महाराष्ट्रात आणि देशात होणाऱ्या विविध स्तरांवरील निवडणूक निकालांचे भाकीत प्रत्येक निवडणुकीवेळी ज्योतिषी वर्तवत असतात. अनेक राजकीय नेते देखील ह्या फसवणुकीला बळी पडतात. त्यामुळे अज्ञानी आणि भाबड्या लोकांच्यात गैरसमज पसरतात आणि अंधश्रध्दा निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने देशातील सर्वच ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून एकवीस लाख रुपये बक्षीस जिंकण्याचं आव्हान दिलं आहे अशी माहिती डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, सम्राट हटकर, रामभाऊ डोंगरे, मिलिंद देशमुख, प्रकाश घादगिने, विनोद वायगणकर, प्रवीण देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाच्याद्वारे दिली आहे. त्यासाठीची आव्हान प्रक्रिया आणि प्रश्नावली देखील महाराष्ट्र अंनिसने जाहीर केली आहे. हे आव्हान राजकीय अंदाज वर्तवणाऱ्या राजकीय अभ्यासकांना नाही तर ज्योतिष्यशास्त्राचा आधार घेऊन राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांना आहे.
काय आहे आव्हान प्रश्नावली :सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीही अंनिसमार्फत ही आव्हान प्रक्रिया लोकप्रबोधनाचा हेतू नजरेसमोर ठेवून राबवली जात आहे. जे ज्योतिषी या आव्हान प्रक्रियेत सहभागी होतील, त्यांना समितीमार्फत एक प्रश्नावली दिली जाईल. या प्रश्नावलीमध्ये अंनिसने ज्योतिषांना काही प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये टी.शैलजा, नितीन गडकरी, राहुल गांधी, महुआ मोईत्रा, कंगना रणौत यांना किती मते पडतील? तसंच कोलकाता उत्तर, नालंदा, रायपूर, बारामती, आग्रा, बेल्लारी या मतदार संघातून कोण विजयी होईल? वाराणसी, बुलढाणा, चांदणी चौक, लडाख, वेल्लोर, भुवनेश्वर या मतदारसंघात सगळ्यात कमी मते कोणाला पडतील? असे प्रश्न आहेत. त्याचबरोबर, संपूर्ण भारतात सर्वांत कमी मते कोणत्या उमेदवाराला पडतील? कोणत्या मतदारसंघात नोटाला जास्त मतदान होईल? पाच हजारांपेक्षा कमी मताधिक्य किती उमेदवारांना मिळेल? या प्रश्नांची अचूक उत्तरे ज्योतिषांनी देणे अपेक्षित आहे.
भविष्य कसे वर्तवले ते सांगावे :राजकीय भविष्य सांगण्यासाठी कोणती ज्योतिष पद्धत वापरली यांची माहिती ज्योतिषांनी देणे अत्यावश्यक आहे. उदा. उमेदवाराची जन्म कुंडली, हस्तरेषा शास्त्र, अंकशास्त्र, टॅरो कार्ड, राशीभविष्य, नाडी भविष्य, होरा शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धत, प्राणी पक्षी यांचा वापर करून वर्तवलेले भविष्य किंवा अर्ज भरताना काढलेला मुहूर्त, प्रचाराचा काढलेला शुभ मुहूर्त, उमेदवाराच्या नावातील अद्याक्षरे इत्यादी.
प्रश्नावली आणि गुण पध्दत :या प्रश्नावलीत एकूण चार प्रमुख प्रश्न असून प्रत्येक प्रश्नांच्या अंतर्गत काही उपप्रश्न आहेत. प्रत्येक योग्य उत्तरला पाच गुण देण्यात येतील. एकूण शंभर गुण अशी या प्रश्नावलीची रचना आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना ते उत्तर ज्योतिषाची कोणती पद्धत आणि कशी वापरून काढले याची सविस्तर माहिती देणे अत्यावश्यक आहे. या माहितीसाठी अर्धे गुण असतील आणि अर्धे गुण उत्तरासाठी असतील.