छत्रपती संभाजीनगर : दिवंगत प्रमोद महाजन यांच्या हत्येमागं षडयंत्र होतं, असा दावा त्यांच्या कन्या तथा माजी खासदार पूनम महाजन यांनी केला. त्यांच्या दाव्यावर आता प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. "माझे भाऊ भाजपाचे नेते होते आणि आता केंद्रात आणि राज्यात त्यांचीच सत्ता आहे. त्यांनी सखोल चौकशी केल्यास काही बाहेर येऊ शकतं. मात्र, कोणी अडचणीत येणार असेल, तर असत्य पण सत्य म्हणून बाहेर पडू शकतं," असं प्रकाश महाजन म्हणाले.
आमच्या कुटुंबाची खूप मोठी हानी : "प्रमोद महाजन यांच्या मृत्यूला 18 वर्षांचा काळ लोटला आहे. त्यामुळं ऐन निवडणुकीच्या काळात हा प्रश्न का विचारण्यात आला? हे कळत नाही. एखाद्या बातमीला पण आयुष्य राहतं, आता हा मुद्दा बाहेर आला तरी किती दिवस त्यावर चर्चा होईल माहीत नाही. पूनमनं ते वक्तव्य केलंय. तिच्याकडं अधिक माहिती असेल, तर तिनं समोर आलं पाहिजे. आमच्या कुटुंबाची खूप मोठी हानी झाली, बदनामी झाली. यात वैयक्तिक खूप मोठं नुकसान झालं," अशी कळकळ प्रकाश महाजन यांनी व्यक्त केली.
भाजपानं चौकशी करावी : "पूनमनं प्रमोद महाजन यांच्या मृत्यूमागं षडयंत्र असल्याचं सांगितलं. त्या भाजपाच्या नेत्या आहेत. खरंतर या प्रकरणाची चौकशी करायला हवी. केंद्रात आणि राज्यात त्यांचेचं सरकार असल्यानं ते चौकशी करू शकतात. त्यांनी चौकशी केली तरी सत्य बाहेर येईल, असं नाही. कोणी अडचणीत येणार असेल, तर असत्य देखील सत्य म्हणून समोर आणलं जाऊ शकतं. ते जर षडयंत्र असेल तर खरंच खेदजनक आहे," असं प्रकाश महाजन यांनी स्पष्ट केलं.