महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण! शरद पवार यांच्या 'लंच डिप्लोमसी'मध्ये दडलंय काय? - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार

Politics behind the lunch diplomacy : लोकसभेच्या तोंडावर शरद पवारांनी राजकीय वर्तुळात नवा डाव टाकल्याची चर्चा आहे. उद्या मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री बारामती दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी या तिघांना घरी जेवणासाठी येण्याचं निमंत्रण दिलं आहे. दोघांनी हे निमंत्रण नाकारलं आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार
ज्येष्ठ नेते शरद पवार

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 1, 2024, 5:48 PM IST

माध्यमांशी संवाद

मुंबई :Politics behind the lunch diplomacy: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना बारामतीत स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड केल्यानंतर पहिल्यांदाच अशा पद्धतीचं स्नेहभजनाचं आमंत्रण राज्याच्या प्रमुखांना देण्यात आलं आहे. त्यामुळे यावरून सध्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. या भोजनाच्या निमंत्रणामागे नक्की दडलंय काय? असा प्रश्नही उपस्थित केला जातोय.

स्वागत करू इच्छितो : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेवणाचं निमंत्रण दिलं आहे. नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शनिवारी (दि. 2 मार्च) रोजी बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने बारामती दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर गोविंदबाग या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा असं पत्र शरद पवार यांच्याकडून त्यांना पाठवण्यात आलं आहे. त्याचबरोबर त्यांनी दूरध्वनीवरूनही मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिलं आहे. परंतु, मी अधिकृत पत्र पाठवूनही आपल्याला हे कळवतो आहे असंही पवार या पत्रात म्हटले आहेत.

राजकीय चर्चांना उधाण : मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती या मैदानात त्या दिवशी महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो. तसंच, सध्याच्या राजकीय घडामोडीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील 'जाणते राजा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या शरद पवार यांनी अशा पद्धतीची भोजन मुत्सद्देगिरी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

राज ठाकरे यांनीसुद्धा ही परंपरा जतन केली : या विषयावर बोलताना भाजप नेते, आमदार आशिष शेलार म्हणाले आहेत की, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तसंच शरद पवार यांनी महाराष्ट्रात संघर्ष असतानाही महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय परंपरा जतन करणारे वातावरण निर्माण केलं. याचसाठी बारामतीतून भोजनाचे आमंत्रणाचं पत्र आलं आहे. याबाबत भोजनाला जायचं की नाही हा निर्णय ते घेतील. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीसुद्धा ही परंपरा जतन केली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच राजकीय घराणी ही परंपरा वर्षानुवर्षे जतन करत आली आहेत. परंतु महाराष्ट्रात असं एक राजकीय बाप-बेटे आहेत ज्यांनी त्यांच्या घरची वडिलोपार्जित चालत आलेली प्रथा परंपरा बंद करुन टाकली असा टोला त्यांनी नाव न घेता ठाकरेंना लगावला आहे.

भाजपाने शिकवायची गरज नाही : याबाबत बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले आहेत की, हा राजकारणाचा विषय नाही. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. आपल्या भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येत असतील तर त्यांनी आपल्या इथं यावं असं त्यांना वाटत असेल, यात काही गैर नाही. शरद पवार यांचं व्यक्तिमत्त्व फार वेगळं आहे. यासाठी भाजपाने शिकवायची गरज नाही. तुमच्या विरोधात बोलायला लागले तर चौकशा सुरू करता. आशिष शेलार यांच्या वक्तव्याला त्यांच्या पक्षातही कोणी विचारत नाही. जे आता भाजपासोबत जात आहेत, त्यांची अवस्था नंतर काय होईल ते समजेल. असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे. तर, या विषयावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत की, शरद पवार साहेबांना कधी कोणाला जेवायला बोलवायचे? आणि राजकारण कसं करायचं. हे सर्व ठाऊक आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या या, एका वाक्यातच बरच काही येऊन जातं असही ते म्हणाले आहेत.

भाजपाचे यामध्ये डर्टी पॉलिटिक्स : या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर शरद पवार यांचं नाव नसल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे. उबाठा गटाच्या नेत्यांनी याबाबत भाजपावर निशाणा साधला आहे. यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले की, हा भाजपाचा कार्यक्रम नसून, हा सरकारचा कार्यक्रम आहे. म्हणून भाजपा यामध्ये डर्टी पॉलिटिक्स करतं असं सांगण्याचा कुणाला अधिकार नाही. तर, आता पत्रिकेत दुरुस्ती करत शरद पवारांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. यावर बोलताना भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले की, हीच खरी आमची संस्कृती आहे. आम्ही कोणाचं आदरातिथ्य करावं हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. परंतु, महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवले होते. त्यावर कोणी काही बोलत नाही.

हेही वाचा :

1मावळात राजकीय भूकंप! राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाला खिंडार; मात्र तालुकाध्यक्षांच्या पुढाकारानं राजकीय नाट्यावर पडदा

2भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; संविधान भेट देत केली 'ही' मागणी

3मनमाडमध्ये संभाजी भिडेंचा ताफा अडवला, दाखवले काळे झेंडे

ABOUT THE AUTHOR

...view details