मुंबई Minor Girl Sexual Assault Case : बदलापूर येथे दोन 4 वर्षीय चिमुरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरून राज्यातील राजकारण प्रचंड तापलंय. या प्रकरणानंतर जनतेचा प्रचंड उद्रेक समोर आलाय. या प्रकरणी भांडवल करण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. तर विरोधकांनी या प्रकरणी 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली असून बदलापूर घटनेत राजकारण होत असल्याचा आरोप करणारेच विकृत मनाचे असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. एकंदरीत या प्रकरणाला राजकीय रंग चढू लागला असून सत्ताधारी आणि विरोधक दोघंही आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र, यामध्ये पीडितांना न्याय कधी मिळणार? हा प्रश्न मात्र मागं पडत चालल्याचं पाहायला मिळतंय.
लाडक्या बहीण योजनेला काळा डाग : महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली. या योजनेला महिलांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु, हे सर्व होत असताना मानवतेला काळीमा फासणारी घटना बदलापुरात घडली. बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. बदलापूरमध्ये जनतेचा मोठा उद्रेक दिसून आला. त्यानंतर या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. ज्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत त्यांना तुमची पंधराशे रुपयाची भीक नको तर सुरक्षा हवी आहे, असं म्हणत लाडकी बहीण योजनेवरून टीका होऊ लागली. या सर्व प्रकरणानंतर हे आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
आंदोलन राजकीय प्रेरित : मुख्यमंत्र्यांनी हे आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचा आरोप केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांना सडेतोड उत्तरं दिली जात आहेत. 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण नाही. माता बहिणींसाठी आपण किती जागरूक आहोत. बहीण सुरक्षित राहिली तरच लाडकी बहिणीसारख्या योजना आणता येतात. यासाठी जात-पात, पक्षभेद बाजूला ठेवून सर्व जनतेनं बंद मध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय.
तर याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, "बदलापूरमध्ये झालेली घटना राजकीय नसून याचा कोणीही फायदा घेत नाहीये. महाराष्ट्रात वाढत चाललेल्या अत्याचारांनी आता परिसीमा गाठलीय. बदलापूरच्या घटनेमध्ये ज्या पद्धतीनं गुन्हा नोंदवण्यास गृह खात्यानं दिरंगाई केली. त्याचबरोबर शाळा संस्थेनं देखील हे प्रकरण दाबण्याचा जो प्रयत्न केला. त्यामुळंच जनता आक्रमक झाली आणि रस्त्यावर उतरली. यामध्ये मुख्यमंत्र्यांना आणि भाजपाला कुठलं राजकारण दिसलं?", असा सवाल जयंत पाटलांनी केला.
मुख्यमंत्र्यांचं फेक नरेटिव्ह : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर फेक नरेटिव्हचे आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की, "लैगिक अत्याचारसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला दोन महिन्यात फाशी दिली. तर ती फाशी कोणाला दिली. त्या आरोपीचं नाव मुख्यमंत्र्यांनी घोषित करावं. तसंच बदलापूरचे आंदोलन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित होतं. कारण आंदोलनकर्ते हे बदलापूरच्या बाहेरचे होते." तर त्यावर मुख्यमंत्र्यांनी पोलिसांची रिमांड कॉपी तपासावी. पोलिसांनी अटक केलेल्या सर्व आंदोलकांचे पत्ते बदलापूरचे आहेत. त्यामुळं विनाकारण मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दोष द्यायचं काही कारण नाही, असं वडेट्टीवार म्हणालेत.