अहिल्यानगर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी गुजरातमधून हवालामार्गे पैसा आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर पोलिसांनी गुजरातमधील दोन भामट्य़ांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 42 लाखांची रोकड जप्त केली आहे. मुकेशकुमार रमेशभाई पटेल, धवलकुमार जसवंतभाई पटेल असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन भामट्यांची नावं असून ते गुजरातमधील गोठवा इथले आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली.
गुजरातमधून हवालामार्गे पैसा पाठवला संगमनेर शहरात :विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलीस आता सतर्क झाले आहेत. संगमनेर शहरातील पार्श्वथान गल्लीत 42 लाख 15 हजार रुपयांची रोख रक्कमेसह पोलिसांनी गुजरात राज्यातील दोघांना ताब्यात घेतलं आहे. संगमनेर शहरातील पार्श्वथान गल्लीत लाखो रुपये बेकायदेशीर येणार असल्याची माहिती अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पथक तयार केले आणि संगमनेर इथं सापळा रचला. त्यानंतर काही साध्या वेशात तर काही वर्दीवर असणार्या पोलिसांना पार्श्वथान गल्लीतील सहदेव ज्वेलर्सच्या वरच्या मजल्यावर दोन व्यक्तींना काही बॅगासह 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ताब्यात घेतलं.