शिर्डी : दुहेरी हत्याकांडचं प्रकरण ताजं असतानाच पोलिसांना गोळीबार झाल्याचा फेक कॉल करणं तिघांना चांगलंच महागात पडलं आहे. शनिवारी (दि.८) रात्री तीन युवकांनी शिर्डी पोलीस स्टेशनच्या दुरध्वनीवर बुद्ध विहार इथं गोळीबार झाल्याचा कॉल केला. पोलिसांनी तत्काळ दखल घेत गोळीबाराचा शोध घेण्यासाठी टीम रवाना केल्या. मात्र, त्या ठिकाणी तपास केला असता असा कोणताच प्रकार घडला नसल्याचं पोलिसांना दिसून आलं. यानंतर पोलिसांनी फोन करणाऱ्या तिघांना शिर्डीतून ताब्यात घेतलं.
फेक कॉल पडला महागात : "बुद्ध विहार इथं गोळीबार झाल्याचा कॉल पोलिसांना आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ परिसरात पथक पाठवून तपास केला. यावेळी पोलिसांना तिथं काहीच आढळून आलं नाही. त्यामुळं पोलिसांनी परिसरात चौकशी केली. त्यानंतर पिंपळवाडी चौक, दत्तनगर परिसर इथंही तपासादरम्यान काही आढळून आलं नाही. यानंतर पोलीस ठाण्यात फोन केलेल्या कॉलरला पोलिसांनी अनेकवेळा फोन केला. परंतु, त्यानं तो उचलला नाही. यानंतर आम्ही दुसऱ्या क्रमांकावरून फोन केला. यावेळी त्या कॉलरनं तो फोन उचलला आणि आम्ही बुद्ध विहार इथं आहे असं सांगितलं. यानंतर आम्ही बुद्ध विहार इथं गेलो असता आम्हाला निष्पण झालं की, या ठिकाणी गोळीबाराची कोणतीही घटना घडली नसताना कॉलरनं पोलीस स्टेशनला फेक कॉल केला," अशी माहिती पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली.