मुंबई Police Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील 17,471 रिक्त पदे भरण्यासाठी संपूर्ण राज्यभर गेल्या महिन्यापासून मैदानी चाचणी परीक्षा सुरू झाल्या आहेत; मात्र अद्याप मैदानाअभावी मुंबईत ही मैदानी चाचणी परीक्षा सुरू झालेली नाही. याबाबत बोलताना मुंबई पोलीस दलाचे प्रशासन विभागाचे सहपोलीस आयुक्त जयकुमार यांनी सांगितले की, आम्ही पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना पावसामुळे कोणतीही गैरसोय होणार नाही याकरिता मुंबई विद्यापीठाच्या वानखेडे स्टेडियमच्या शेजारी असलेल्या मैदानावर आणि जीआरपीच्या घाटकोपर येथील मैदानावर १९ जुलैपासून मैदानी चाचणी परीक्षा घेण्यास सुरुवात करणार असल्याचं सांगितलं आहे.
महिला उमेदवारांसाठी केली ही व्यवस्था :सिंथेटिक पृष्ठभाग असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या वानखेडे स्टेडियमच्या शेजारी असलेल्या मैदानावर आणि जीआरपीच्या घाटकोपर येथील मैदानावर १९ जुलैपासून पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेला सुरुवात होणार आहे. या सिंथेटिक पृष्ठभागावर पावसाचे पाणी राहत नसल्यानं या मैदानांची निवड करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या वानखेडे स्टेडियमच्या शेजारी असलेल्या मैदानावर महिला उमेदवार आणि जीआरपीच्या घाटकोपर येथील मैदानावर पुरुष उमेदवारांची मैदानी परीक्षा घेण्यात येणार आहे. सुरुवातीला मुंबई विद्यापीठाच्या वानखेडे स्टेडियमच्या शेजारी असलेल्या मैदानावर ५०० महिला उमेदवारांना आणि जीआरपीच्या घाटकोपर येथील मैदानावर १ हजार पुरुष उमेदवारांना १९ जुलैला मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले आहे.
भरतीसाठी आले इतके अर्ज :पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत 4 हजार 230 पोलीस कॉन्स्टेबलची भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी पोलिसांकडे 5 लाख 69 हजार अर्ज आले आहेत. त्यापैकी 2 हजार 572 पोलीस हवालदार, 917 चालक, 717 तुरुंग हवालदार आणि 24 बँड्समन पदांसाठी अर्ज करण्यात आले आहेत, अशी माहिती प्रशासनाचे सहआयुक्त एस. जयकुमार यांनी दिली आहे.