महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती पोलीस अलर्ट; मध्यप्रदेश सीमेवर आठ चेक पोस्ट - Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमिवर अमरावती प्रशासन सज्ज झालं आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर आठ चेकपोस्ट उभारले आहेत.

Lok Sabha Election 2024
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि जिल्हाधिकारी सौरभ कटियार

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 19, 2024, 8:04 AM IST

Updated : Mar 19, 2024, 2:07 PM IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती पोलीस अलर्ट

अमरावती Lok Sabha Election 2024 :लोकसभा निवडणूक 2024 आचारसंहिता लागू झाली असून अमरावती लोकसभा मतदार संघासाठी 26 एप्रिलला मतदान होणार आहे. या निवडणुकीदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस दल, उत्पादन शुल्क विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाला अलर्ट करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितलं. मध्यप्रदेशातून अमरावती जिल्ह्यात अवैधरित्या पैसे किंवा दारूसाठा येऊ नये, यासाठी दोन्ही राज्यांच्या सीमेवर आठ ठिकाणी चेक पोस्ट लावण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचं जिल्हाधिकारी कटियार यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

मध्य प्रदेश सीमेवर असे असणार चेक पोस्ट :मध्य प्रदेश सीमेसोबत अमरावती लोकसभा मतदारसंघातील धारणी, चिखलदरा, अचलपूर आणि मोर्शी असे चार मतदारसंघ जोडलेले आहेत. या चारही तालुक्याला लागलेल्या सीमेवरून अनेकदा अवैध तस्करी होते. दरम्यान निवडणूक काळात या भागातून कुठलाही गैरप्रकार घडू नये, यासाठी धारणी तालुक्यात एकूण दोन चेक पोस्ट लावले जाणार असून चिखलदरा तालुक्यात एक, अचलपूर तालुक्यात दोन आणि मोर्शी तालुक्यात तीन चेक पोस्ट लावले जातील, असे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितलं आहे.

निवडणुकीसाठी 77 भरारी पथकं गठीत :लोकसभा निवडणुकीदरम्यान अमरावती मतदारसंघात कुठलीही गडबड होणार नाही, यावर लक्ष देण्यासाठी अमरावती पोलीस आयुक्तालयात 77 भरारी पथकं गठीत करण्यात आले आहेत. या 77 भरारी पथकांपैकी 9 पथकं हे बडनेरा विधानसभा मतदारसंघात लक्ष देतील तर 9 पथकं, अमरावती विधानसभा मतदारसंघात 10 पथकं तिवसा मतदार संघात, सहा पथकं मोर्शी विधानसभा मतदारसंघात, 9 पथकं अचलपूर मतदारसंघात तसेच प्रत्येकी 10 पथकं हे दर्यापूर आणि मेळघाट मतदार संघात तैनात राहणार आहेत. सोमवारी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी नियोजन भावनात आयोजित जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत आयोजित झालेल्या बैठकीत या भरारी पथकांना आवश्यक त्या सूचना देखील दिल्या.

शस्त्र जप्त करण्याची कारवाई :अमरावती शहर आणि जिल्ह्यात ज्यांच्याकडं शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे, त्यांच्याकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र जप्त करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. अतिशय गरजेच्या आणि महत्त्वाच्या ठिकाणचेच शस्त्र संबंधितांकडं ठेवण्याची सूट राहील, असं पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी स्पष्ट केलं आहे.

अमरावतीत 24 लाख 16 हजार 345 मतदार :अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण 24 लाख 16 हजार 345 मतदार आहेत. अमरावतीत 26 एप्रिलला मतदान होणार असून एकूण 264 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली आहे. जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी एकूण 16 हजार 32 मनुष्यबळ आहे यापैकी 249 झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मेळघाटातील अतिदुर्गम भागात जाऊन मतदारांकडून मतदान करुन घेण्यासाठी आमची यंत्रणा सज्ज असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

384 उमेदवारांसाठी 24 ईव्हीएम :"सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी मराठा समाजातील शेकडो उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत अमरावती लोकसभा मतदारसंघात जर मोठ्या संख्येनं उमेदवार आलेत तर प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. एकूण 384 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तर एकूण 24 ईव्हीएम जोडावे लागतील. आमची तशी तयारी आहे," असं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा :

  1. MP Navneet Rana : नवनीत राणा भाजपामध्ये जाण्यासाठी सज्ज; अपक्ष लढण्याचीही तयारी
  2. Lok Sabha Election 2024 : खासदार नवनीत राणांची उमेदवारी अनिश्चित; अमरावतीत वेट अँड वॉच
  3. खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Last Updated : Mar 19, 2024, 2:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details