मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांनी पाळंमुळं खोदण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी शुक्रवारी पाच आरोपींना अटक केल्यानंतर या खून प्रकरणाला गती मिळाली आहे. मुंबई पोलिसांना मारेकऱ्यांच्या फोनमध्ये बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकी यांचा फोटो मिळाला आहे. त्यामुळे पोलीस जवान सतर्क झाले आहेत. पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांची सुरक्षा करणाऱ्या पोलीस शिपायाला कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरुन निलंबित केलं आहे. श्याम सोनवणे असं या निलंबित करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचं नाव आहे. श्याम सोनवणे यांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.
मारेकऱ्यांच्या फोनमध्ये झिशान सिद्दीकींचा फोटो :बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई पोलिसांना बाबा सिद्दीकी हत्याकांडात मोठी धक्कादायक माहिती मिळाली आहे. मारेकऱ्यांच्या फोनमध्ये पोलिसांना आमदार झिशान सिद्दीकी यांचा फोटो आढळून आला आहे. हे मारेकरी आमदार झिशान सिद्दीकी यांच्याबाबतची माहिती सोशल माध्यमातून मारेकऱ्यांपर्यंत पोहोचवत होते, असं पोलीस तपासातून उघड झालं आहे. मुंबई पोलिसांनी याबाबतचा तपास सुरू केला आहे.