मुंबई Ghatkopar Hoarding Case: तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या अडचणीत दिवसागणित वाढ होताना दिसून येत आहे. निविदा प्रक्रियेशिवाय घाटकोपर येथे कोसळलेल्या भल्या मोठ्या होर्डिंगला परवानगी कैसर खालिद यांनीच दिली असल्याचं, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकानं केलेल्या तपासात उघडकीस आलं आहे. तसेच आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांनी रविवारी म्हणजेच १८ डिसेंबर २०२२ रोजी आलेली इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे एकमेव निविदेची नोटिंग करून घेतली असल्याचं तपासात उघडकीस आलं आहे.
एसआयटी तपास सुरू : घाटकोपरच्या छेडानगरमधील होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून घडलेल्या दुर्घटनेत १८ निष्पापांचा बळी गेला असून ८० हून अधिक जण जखमी झाले. या घटनेबाबत गुन्हा नोंद करुन तपास करत असलेल्या पंतनगर पोलिसांनी होर्डिंगचे भाडेपट्ट्यावर कंत्राट मिळालेल्या इगो मीडिया प्रा.लि. संचालक भावेश भिंडे याच्यासह अन्य संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने हा गुन्हा गुन्हे शाखेकडं वर्ग करण्यात आला असून गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक (एसआयटी) याचा तपास करत आहे.
सुट्टीच्या दिवशी फाईलवर दिली सही :गुन्हे शाखेने याप्रकरणी भावेश भिंडे याला अटक केली असून न्यायालयानं त्याला २९ मे पर्यंत कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने होर्डिंगच्या परवानगी बाबत केलेल्या तपासात कैसर खालिद यांच्या बदलीचे आदेश १६ डिसेंबर २०२२ रोजी जारी करण्यात आले. त्याचवेळी भिंडे यांच्या कंपनीने होर्डिंगच्या परवानगीसाठी अर्ज दिला होता. बदली आदेश निघाल्यानंतर खालिद यांनी सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी १८ डिसेंबर २०२२ रोजी होर्डिंगला परवानगी देण्याच्या फाईलवर सही केली. दुसऱ्या दिवशी १९ डिसेंबर २०२२ ला होर्डिंगला परवानगी दिल्याचं आदेश जारी करण्यात आलंय.