मुंबई Dindoshi Court News : पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या रेहान कुरैशी या आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्त केलंय. पोक्सो खटल्यांच्या विशेष न्यायाधीश, दिंडोशी सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. टाकळीकर यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केलीय. ॲड नाजनीन खत्री यांनी आरोपी रेहान कुरेशीची बाजू मांडली तर सरकारी वकील ॲड मालणकर यांनी या प्रकरणात राज्याची बाजू मांडली.
नेमकं प्रकरण काय : पोलिसांना या प्रकरणात कुरैशीविरोधात पुरेसे सबळ, विश्वासार्ह पुरावे न्यायालयासमोर मांडता न आल्यानं न्यायालयानं आरोपीची निर्दोष मुक्तता केलीय. कुरैशीविरोधात 20 गुन्हे दाखल आहेत. आरोपी कुरैशी विरोधात विविध कलमांन्वये व लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) (POCSO) चे कलम 12 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. आरोपीला 8 एप्रिल 2019 ला अटक करण्यात आली होती. तर 30 ऑगस्ट 2023 ला त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र दुसऱ्या इतर खटल्यांमध्ये तो सध्या तळोजा कारागृहात आहे. आरोपी रेहान कुरैशीविरोधात मुंबई, वसई, नवी मुंबई आणि ठाणे इथं अल्पवयीन मुलींवर बलात्कार, अपहरण आणि विनयभंग केल्याचा आरोप आहे व त्या खटल्यांची सुनावणी सुरु आहे. कुरैशी विरोधात दाखल करण्यात आलेल्या इतर 19 गुन्ह्यांसाठी तो न्यायालयीन कोठडीत असून सध्या तळोजा कारागृहात कैदेत आहे. 5 डिसेंबर 2015 रोजी हा गुन्हा घडला होता. या प्रकरणी गोरेगाव पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला होता.