मुंबई :महाराष्ट्रात आगामी होणाऱ्या पंधराव्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून महत्त्वाच्या प्रमुख नेत्यांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली. 29 ऑक्टोंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात होईल. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या प्रचारासाठी राज्यात 7 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर असे 8 दिवस महाराष्ट्रात तळ ठोकून असणार आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचा पाहिजे तसा फायदा महायुतीला झाला नाही, असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Reporter) पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 नोव्हेंबरपासून परदेश दौऱ्यावर :महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम रंगलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर असे 8 दिवस महाराष्ट्रात प्रचारासाठी तळ ठोकून असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 नोव्हेंबरपासून परदेश दौऱ्यावर जाणार असल्यानं त्यांना प्रचारासाठी फार वेळ मिळणार नाही. परंतु या 8 दिवसात मुंबईसह राज्यात जास्तीत जास्त प्रचार सभा घेण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ भाजपाच नाही, तर महायुतीच्या घटक पक्षांच्या उमेदवारांसाठी सुद्धा प्रचार सभा आणि रोड शो घेणार आहेत.
प्रचारासाठी फार कमी अवधी :राज्यात पुन्हा एकदा सत्तेत कायम राहण्यासाठी महायुतीकडून कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडं आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला कमी जागांवर रोखल्यानं महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी महायुतीकडून प्रचारादरम्यान सर्वतोपरी प्रयत्न केले गेले. तरीही महायुतीला कमी जागांवर रोखण्यात आलं. अशात 20 नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात सर्व 288 मतदारसंघात निवडणूक होत असून 18 नोव्हेंबर हा प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल घोषित होणार आहेत. अगोदरच जागावाटपांसह उमेदवारांची घोषणा करण्यासाठी झालेला उशीर, त्यात प्रचार करण्यासाठी भेटणारा कमी अवधी, या कारणानं राज्यात स्टार प्रचारकांच्या सभा वाढवण्याकडं महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोर दिला जाणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या प्रचाराचा लोकसभेला झाला नाही फायदा :लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रचारात 18 सभा आणि मुंबईत 1 रोड शो केला. परंतु इतक्या सभा आणि रोड शो घेऊन सुद्धा महायुतीला मोठ्या जागा जिंकण्यात यश आलं नाही.महाविकास आघाडीनं 29 जागांवर यश संपादित केलं. तर भाजपाला दोन अंकी आकडाही गाठता आला नाही. भाजपाचे फक्त 9 उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी ज्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारीसाठी प्रचार सभा घेतल्या त्यातील बहुतेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. सुधीर मुनगंटीवार, अशोक नेते, राजू पारवे, सुनील मेंढे, नवनीत राणा, रामदास तडस, संजय मंडलिक, शिवाजीराव आढळराव पाटील, सुनेत्रा पवार, अर्चना पाटील, हिना गावित, हेमंत गोडसे, भारती पवार अशा दिग्गज नेत्यांच्या मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊनही या सर्वांचा पराभव झाला. या कारणानं पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात महायुतीच्या प्रचारासाठी 8 दिवस तळ ठोकून बसणार असले, तरीसुद्धा महाविकास आघाडीकडून राहुल गांधी, प्रियांका गांधी, अरविंद केजरीवाल यांनाही प्रचारात उतरवण्याची तयारी करण्यात आली आहे.
हेही वाचा :
- राज्याला मिळाली 10 वैद्यकीय महाविद्यालय; पंतप्रधानांच्या हस्ते प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन
- मोदी सरकारचा मोठा निर्णय; तब्बल 'इतके' वर्ष मिळणार 'मोफत धान्य'
- "स्वस्थ आणि समृद्ध महाराष्ट्राची पायाभरणी...", पंतप्रधान मोदींच्या हस्ते नागपूर विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं भूमिपूजन