छत्रपती संभाजीनगर PM Narendra Modi Visit Jalgaon Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. जळगाव येथे लखपती दीदी योजनेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते केला जाणार आहे. या दौऱ्यासाठी विशेष यंत्रणा सज्ज करण्यात आलीय. दुपारी १२ ते २ या काळात प्राईम इंडस्ट्रियल पार्क येथे हा कार्यक्रम होणार असून, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांमुळं हा कार्यक्रम होत असल्याचं बोललं जातंय. या निमित्तानं भाजपाचा विधानसभा निवडणुकीचा प्रचार देखील सुरू होईल, अशी शक्यता आहे. ऐनवेळी पंतप्रधान मोदींनी जिल्ह्यातील काही माहिती विचारली तर अडचण नको याकरिता जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
असा असेल पंतप्रधान मोदी यांचा दौरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारी महाराष्ट्र दौरा आहे. ते सकाळी दिल्ली येथून निघणार आहेत. त्यानंतर सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल होतील. तिथून हेलिकॉप्टरद्वारे जळगावकडं रवाना होतील. सकाळी ११.१५ ते १२ पर्यंत बचतगटाच्या महिलांशी संवाद साधतील. त्यानंतर प्राईम इंडस्ट्रियल पार्क येथील लखपती दीदी कार्यक्रमाला हजेरी लावतील. दुपारी १२ ते १.३५ पर्यंत ते कार्यक्रमात राहतील. तेथून पुन्हा हेलिकॉप्टरद्वारे छत्रपती विमानतळ येथे दाखल होतील आणि येथून ते राजस्थानला जातील.
सरकारी अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारी दौरा असल्यामुळं सरकारी अधिकाऱ्यांची हक्काची चौथ्या शनिवारची आणि रविवारची शासकीय सुट्टी रद्द करण्यात आली. जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमधून पंतप्रधान जाणार असल्याने, अचानक त्यांनी काही माहिती मागवली तर ती उपलब्ध व्हावी यासाठी दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढून सरकारी सुट्ट्या रद्द केल्या आहेत.