पुणे Pm Modi Inaugurates Pune Metros Stretch : मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता इथून दूरदृश्य प्रणालीद्वारे या मार्गावरील मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. याचबरोबर पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित मार्गाचं भूमिपूजनही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं.
रुबी हॉल ते रामवाडी विस्तारित मेट्रो मार्ग :रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गावर बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी ही स्थानकं असून हा मार्ग 5.5 किमीचा आहे. या मार्गावरील येरवडा स्थानकाच्या प्रवेशद्वाराचा एक जीना नगर रस्त्यात येत असल्यानं महापालिकेनं तो दुसरीकडं हलवण्यास सांगितलं होतं. त्यानुसार महामेट्रोकडून जीना दुसरीकडं करण्याचं काम सुरू झालं आहे. त्यामुळे या मार्गावरील सेवेतून येरवडा स्थानक सध्या वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच हे स्थानक सुरू केलं जाणार आहे. वनाझ ते रामवाडी हा मार्ग साडे पंधरा किलो मिटरचा आहे. याचं तिकीट हे 20 रू असून 20 ते 25 मिनिटात हा मार्ग आता पूर्ण करता येणार आहे.
मेट्रोची विस्तारित सेवा 1 ऑगस्टला झाली सुरू :मेट्रोची विस्तारित सेवा गेल्या वर्षी 1 ऑगस्टला सुरू झाली. वनाज ते रुबी हॉल हा 9.7 किलोमीटरचा मार्ग या आधी सुरू झाला होता. आधी या मार्गावर वनाज ते गरवारे स्थानकापर्यंत सेवा सुरू झाली. नंतर गरवारे ते रुबी हॉल स्थानकापर्यंत सेवेचा विस्तार झाला. आता वनाज ते रामवाडीपर्यंत मार्ग पूर्णपणे सुरू झाला आहे.
- वनाज ते रामवाडी : 16 किलोमीटर
- पिंपरी चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय : 13 किलोमीटर