पालघर Chhtrapati Shivaji Maharaj Statue :नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना 26 ऑगस्ट रोजी घडली. या घटनेनंतर राज्यभरातील शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. तसंच याप्रकरणी सत्ताधाऱ्यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. असं असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागितली आहे. ते पालघरमध्ये बोलत होते.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी? :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (30 ऑगस्ट) वाढवण इथल्या बंदराचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यानंतर सभेला संबोधित करत असताना मोदी यांनी मालवणमधील घटनेवरुन माफी मागितली. ते म्हणाले की, "2013 ला जेव्हा भारतीय जनता पक्षानं मला प्रधानमंत्री उमेदवार म्हणून निश्चित केलं तेव्हा सर्वात अगोदर मी रायगडच्या किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर बसून प्रार्थना केली होती. एक भक्त ज्या पद्धतीनं भक्ती भावानं प्रार्थना करतो, तसा मी राष्ट्रसेवेच्या कामाचा प्रारंभ केला होता. माझ्यासाठी, माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाहीत. ते आमच्यासाठी राजा, महाराजा, राजपुरुष ही नाहीत. मात्र, आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे 'देव' आहेत. आज मी माझी मान झुकवून छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो."
जनतेचीही मागितली माफी :पुढं ते म्हणाले की, "आमच्यासाठी संस्कार महत्त्वाचे आहेत. आम्ही तसे नाही आहोत जे सावरकरांना शिव्या देतात, त्यांची माफी मागत नाही. न्यायालयात लढाई लढायला तयार आहेत. हे सर्व करून त्यांना पश्चाताप होत नाही. आज इथं आल्यानंतर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांची क्षमा मागतोय. तसंच या घडलेल्या प्रकारामुळं छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या जनतेची सुद्धा माफी मागतो."
राष्ट्रवादीकडून टीका :दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगेच प्रत्युत्तर दिलंय. अशा चुकीला महाराज कधीच माफ करणार नाहीत असं ते म्हणालेत. यासंदर्भात जयंत पाटील यांनी एक्सवर पोस्ट केली असून ते म्हणालेत की, "भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो. त्यामुळं साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही. प्रायश्चित अटळ आहे. जय शिवराय!"