वर्धा PM Narendra Modi Wardha Visit : पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी विविध लाभार्थ्यांना 'पीएम विश्वकर्मा' अंतर्गत कर्जाचं वाटप केलं. तसंच त्यांनी अमरावती येथे 'पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन आणि ॲपेरल (पीएम मित्रा) पार्क'ची पायाभरणीही केली. एक हजार एकरावर पसरलेल्या या पार्कचा विकास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) करत आहे.
काँग्रेसमध्ये द्वेष भरला :पंतप्रधान मोदी म्हणाले, "ज्यांनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले, त्यांना पुन्हा संधी द्यायची नाही. काँग्रेसच्या धोकेबाजीपासून महाराष्ट्राला आम्हाला वाचवायचं आहे. महात्मा गांधी असायचे, ती काँग्रेस आता राहिली नाही. आताच्या काँग्रेसमध्ये द्वेष भरला. तुकडे-तुकडे गँग आणि अर्बन नक्सल काँग्रेस चालवत आहे. आजची काँग्रेस गणपती पूजेचा द्वेष करते. आम्हाला एकजूट होऊन काँग्रेसला उत्तर द्यावे लागेल. आम्हाला परंपरा जपत प्रगती करायची आहे."
३ लाख रुपयांपर्यंत लोन : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " या योजनेला यशस्वी करण्यासाठी वेगवेगळे विभाग एकत्रित झाले आहेत. या वर्षभरात २० लाखांपेक्षा जास्त लोकांना जोडले आहे. ८ लाख लोकांना स्किल ट्रेनिंग देण्यात आले. महाराष्ट्रात ६० हजार लोकांना नवीन टेक्नॉलॉजी शिकवली जात आहे. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता सुधारली आहे. कोणत्याही गॅरंटीशिवाय ३ लाख रुपयांपर्यंत लोन मिळतंय. तसंच वर्षभरात १४०० कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. मी प्रदर्शनी बघायला गेलो, तेव्हा अद्भुत काम सुरू असल्याचं दिसले."
काँग्रेसवर हल्लाबोल : काँग्रेसवर टीका करत पंतप्रधान मोदी म्हणाले, "मागील सरकारनं (आघाडी) जर विश्वकर्मा बांधवांची चिंता केली असती तर परिस्थिती वेगळी असती. काँग्रेसने जाणीवपूर्वक विश्वकर्मा बांधवाना पुढे जाऊ दिल नाही. या योजनेचा लाभ एसटी, एससी आणि मागासवर्गीय समाजाला मिळत आहे. विश्वकर्मा कारागीर बनून न राहता ते उद्योजक बनले पाहिजेत. त्यांना 'एमएसएमई'चा दर्जा दिला आहे. हे सर्व आपल्या व्यवसायाला पुढे घेऊन गेले पाहिजे. कौशल विकास योजना आणि 'स्किल इंडिया मिशन' सुद्धा या योजनेला मदत करत आहे."
वर्ध्यातून गांधींनी ग्रामीण उद्योगांना चालना दिली : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " पीएम विश्वकर्मा योजनेच्या यशाचा उत्सव आहे. अमरावतीमधील पीएम मित्र पार्क हे मोठे पाऊल आहे. विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमासाठी वर्ध्याला निवडले आहे. वर्ध्यातून गांधींनी ग्रामीण उद्योगांना चालना दिली होती. टेक्सटाईल क्षेत्रात पुन्हा भारताला गौरव मिळवून देणार आहे. मधल्या काळातील सरकारनं विश्वकर्मा कामगारांकडे दुर्लक्ष केले. आमच्या सरकारकडून विश्वकर्मा कामगारांकडे लक्ष देण्यास सुरुवात करण्यात आली. विश्वकर्मा कामगारांचं जीवनमान उंचावणं हे आमचे ध्येय आहे."
मुख्यमंत्र्यांकडून मोदींचं कौतुक :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाला महासत्ता बनवण्याचं 140 कोटी लोकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या काही वर्षांत जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारताचं स्थान मजबूत होणार आहे."
PM मित्र पार्क : केंद्र सरकारनं वस्त्रोद्योगासाठी सात 'पीएम मित्र पार्क' उभारण्यास मान्यता दिली होती. कापड उत्पादन आणि निर्यातीसाठी भारताला जागतिक केंद्र बनवण्याच्या दृष्टीकोनातून PM मित्र पार्क हे एक मोठे पाऊल असणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या सुविधांमुळे जागतिक दर्जाची औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होईल. थेट विदेशी गुंतवणुकीसह (एफडीआय) मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक देशात आकर्षित होईल. या क्षेत्रात नावीन्य आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल.
विविध योजनांचा शुभारंभ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारच्या ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ योजनेचा शुभारंभ केला. या योजनेंतर्गत 15 ते 45 वयोगटातील युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी होण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. तसेच विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्यभरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. दरवर्षी सुमारे 1,50,000 युवकांना राज्यभरात मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण मिळणार आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मोदी 'पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजना' लाँच करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सला सुरुवातीच्या टप्प्यात मदत केली जाईल.
हेही वाचा-
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, 'राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा' कार्यक्रमात होणार सहभागी - PM Narendra Modi Wardha Tour
- मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी निवडणुकीपूर्वी मोदींचे महाराष्ट्र दौरे? राज्यात नरेंद्र मोदी यांची जादू चालेल? - Narendra Modi