शिर्डी (अहिल्यानगर) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील विविध प्रकल्पांच्या उद्घाटनांचा आणि पायाभरणीचा धडाका सरकारकडून सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑनलाईन पद्धतीनं राज्यातील विविध विकासकामांचं उद्घाटन केलं आहे. नागपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विविध कामांचं आणि शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील नवीन टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन केलं. तसेच नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटनदेखील केलं.
एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये 900 ने वाढ : केंद्र सरकारनं नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली होती. या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये 900 ने वाढ होणार आहे. एकूण 35 महाविद्यालयात प्रतिवर्ष 4850 एमबीबीएस जागा उपलब्ध होणार आहेत. एकाच शैक्षणिक वर्षात मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा, गडचिरोली आणि अंबरनाथ (ठाणे) अशा 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या मंजुरीच्या ऐतिहासिक निर्णयांमुळं ग्रामीण व दूरस्थ भागात विशेषोपचार आरोग्यसेवेत लक्षणीय सुधारणा होणार आहे.
10 वैद्यकीय महाविद्यालयांची भेट :पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आज महाराष्ट्राला 10 वैद्यकीय महाविद्यालयांची भेट मिळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूरच्या अपग्रेडेशन आणि शिर्डी विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणीही करण्यात आली आहे. राज्यात मेट्रोचा विस्तार केला जात आहे. विमानतळांचे अपग्रेडेशन केले जात आहे. राज्यात पायाभूत सुविधा, सौरऊर्जा आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित विविध योजना सुरू केल्या जात आहेत. सर्वात मोठ्या कंटेनर बंदराची पायाभरणी झाली आहे."