ठाणे Pitru Paksha 2024 : मनुष्याच्या मृत्युनंतर हिंदू धर्मात 'काकस्पर्श' महत्वाचा मानला जातो. पितृपंधरवड्यात (Pitru Pandharwada) घरातील मृत व्यक्तीने कावळ्याच्या (Crow) रूपाने पिंडाला स्पर्श केला तर आत्म्याला शांती मिळते असा समज आहे. परंतु, दुर्दैवाने ठाणे शहरात आज जिकडे तिकडे 'पावडर पफ', 'गुलमोहर', 'बहावा' या सारख्या विदेशी झाडांमुळं कावळ्यांच्या अधिवासासाठी आवश्यक अशा देशी झाडांची संख्या कमी झालीय.
कावळ्यांची संख्या होत आहे कमी :कावळ्याला घरटी बांधण्यासाठी लागणारे काट्याकुटे, पालापाचोळा हा दिसेनासा झाला आहे. तर सण उत्सवाच्या काळात मुक्या पक्षांना घाबरवणारी घातक अशी विद्युत रोषणाई आणि गल्लोगल्ली कानठळ्या बसतील असे ध्वनी प्रदूषण. या कारणांमुळं दिवसेंदिवस कावळ्यांची संख्या कमी होत असल्याची माहिती, पर्यावरण अभ्यासक विक्रम यंदे यांनी दिली.
कोणा कोणाच्या घरी जाऊन? : भाद्रपद वद्य पक्ष पौर्णिमेपासून ते भाद्रपद कृष्णपक्ष अमावस्या असे 15 दिवस 'पितृपंधरवडा' म्हणून गणला जातो. पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभो. यासाठी श्राध्द घालण्याचा प्रघात असून घरोघरी कागवास ठेऊन कावळ्यांना काव... काव... म्हणून मानाने बोलावले जाते. एरवी कावळाला हाकलून दिलं जातं. मात्र, पितृपक्षात कावळ्यांचा मान, थाट काही वेगळाच असतो. आता तर कावळ्यांची संख्या कमी झाल्यामुळं कोणा कोणाच्या घरी जाऊन घास खाऊ अशी वेळ कावळ्यांवर आलीय. दिवसागणिक कावळ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. या संदर्भात पर्यावरण अभ्यासक विक्रम यंदे यांनी 'ईटिव्ही भारत'शी संवाद साधला.
घरटी बांधायला देशी वृक्षच नाहीत: मुळात शहरात कावळ्यांना घरटी बांधण्यासाठी देशी झाडे उरली नाहीत. कावळ्यांना घरटी बांधण्यासाठी योग्य झाड कोणते यांचं उपजत ज्ञान असतं. त्यामुळं गुलमोहर, बदामासारखे कितीही मोठे वृक्ष असले तरी त्या झाडावर कावळे, चिमण्या घरटी बांधत नाहीत. कारण त्यांना केव्हाही उन्मळून पडणारी विदेशी जातीची झाडे अधिवासाठी संरक्षित वाटत नाहीत. वृक्ष कितीही मोठा असला तरी कावळा त्या ठिकाणी घरटे न बांधता कडुनिंब सारख्या छोट्या पण मजबूत फांद्या असलेल्या झाडावरच घरटे बांधतो. त्यामुळं कावळ्यांना घरटी बांधण्यासाठी शहरात देशी जातीचे झाडे नाहीत. तर घरटे बांधण्यासाठी एखादी जागा आहे. पण, घरटी बांधण्यासाठी पालापाचोळा, सुकलेल्या काड्यासारखे साहित्य घोडबंदर सारख्या ठिकाणी अभावानेच आढळते. पण जुन्या ठाण्यात आजही देशी झाडे, पालापाचोळा कावळ्यांना घरटी बांधण्यासाठी उपलब्ध आहे. म्हणूनच की काय, ऐन पितृपक्षात कावकाव केल्यावर कागवासावर ठेवलेला घास घेऊन जातात.