ठाणे Phangulgavan Villagers Built Bridge :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील ग्रामस्थांनी श्रमदानातून 'देशी जुगाड' करत पूल उभारला होता. या घटनेची बातमी 'ईटीव्ही भारत'नं प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी घेतलीय. आदिवासीच्या दिनाच्या पूर्व संध्येला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुलासाठी 60 लाखांचा निधी मंजूर केलाय. तसंच खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनीही 30 लाखांचा निधी दिलाय. त्यामुळं अदिवासी बांधवांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे गेल्या 15 वर्षापासून या भागातील ग्रामस्थ पूल उभारण्याची मागणी करत होते. लवकरच या ठिकाणी पूल उभारण्यात येणार असल्यानं गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
श्रमदान करत पुलाची निर्मिती : कल्याण-नगर राष्ट्रीय मार्गावर माळशेज घाटाच्या पायथ्याशी मुरबाड तालुक्यात फांगुळगव्हाण ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत हद्दीत सुमारे अडीच हजार लोकसंख्या असून तीन महसुली गावं तसंच चार आदिवासी गाव पाडे आहेत. मात्र, आजही ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील शेकडो गाव-पाड्यावर जाण्यासाठी रस्ता, वीज, पाणी पोहचलेलं नाही. त्यातच , मुरबाड तालुक्यातील मोरोशी आश्रम शाळेत परिसरातील आदिवासी विद्यार्थांना जीवघेणा प्रवास करावा लागत होता. यातच एक विद्यार्थी पुराच्या पाण्यात वाहून जाताना त्याला नागरिकांनी वाचवलं होतं. या घटनेनंतर शासनाच्या मदतीची वाट न पाहता गावकऱ्यांनी बैठक घेऊन या ठिकाणी आदिवासी काळातील पारंपरिक पूल उभारण्याचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे फांगुळगव्हाण ग्रामस्थानी जवळपास 40 हजार रुपये वर्गणी गोळा करत श्रमदान केलं. शिवाय ग्रामपंचायतीनंही टाकाऊ लोखंड या पुलासाठी दिलं.