बारामती (पुणे) Sharad Pawar On BJP : नवीन पिढी तयार करणे, त्यांच्यामार्फत विकासाची कामे करून घेणे हाच माझा स्वभाव आहे. गेल्या २० वर्षांत मी स्थानिक राजकारणात लक्ष दिले नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, कारखाने यात कोणाला संधी द्यायची हे मी बघत नव्हतो. पण नव्या पिढीच्या हाती सूत्रे द्या, त्यातून योग्य ते काम करा. अडचण आली तर माझ्याकडे या, हे मी सांगत होतो. पण काही लोकांनी टोकाची भूमिका घेतली. ते भाजपाबरोबर गेले, असं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ते आज (8 एप्रिल) बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते.
भाजपाबद्दल काय म्हणाले शरद पवार? :शरद पवार बोलताना पुढे म्हणाले की, "भाजपा हा सर्वसामान्यांच्या हिताची जपणूक करणारा पक्ष नाही. त्यांच्या बरोबर जाण्यासाठी लोकांनी अजित पवारांना मतं दिली नव्हती. मागील विधानसभा निवडणुकीत तुम्ही मतदान हे राष्ट्रवादीच्या नावाने केले. आज ते हे विसरून भलतीकडे जात आहेत. माझ्या मते हा चुकीचा रस्ता आहे. मी २० वर्षांत स्थानिक विषयात लक्ष घालत नव्हतो; परंतु मोठ्या प्रकल्पांच्या बाबतीत, उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहत होतो. परिणामी, एमआयडीसीत २५ हजार लोकांना रोजगार मिळाला. उंडवडीसारख्या गावात उद्योजक तयार झाले. आता गावची स्थिती सुधारली आहे की नाही, असा सवाल त्यांनी केला. मी सातत्यपूर्ण काम केल्यामुळेच स्थिती सुधारली", असं ते म्हणाले.