छत्रपती संभाजीनगर Assembly Election 2024 : राज्यात आरक्षणाच्या सुरू असलेल्या वादातून नवनवे राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात एकीकडं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अपक्ष उमेदवार निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलाय तर दुसरीकडं वंचित बहुजन पक्षानं 100 ओबीसी आमदार निवडून आणण्याचा निश्चय केलाय. त्यामुळे विधानसभा निवडणुका लागण्याच्या आधीच राजकीय गणितावर चर्चांना उधाण आलं आहे. पुन्हा एकदा विकासाच्या नाही, तर जातीच्या आधारावर मतदान होणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मनोज जरांगे 180 उमेदवार करणार उभे :मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी गेल्या वर्ष भरापासून समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. उपोषण, आंदोलन, मोर्चे काढूनही सरकार मागणी मान्य करायला तयार नाही. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात आरक्षणाच्या मागणीचा परिणाम दिसून आला अन् अनेक दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागला. आंदोलनात कोणाला पाडायचं ते ठरवणार असं म्हणत विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला. उपोषण करुन फायदा नाही, आता निवडणुकीत धोबी पछाड द्यायची. जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आणि विधानसभेत आरक्षणाच्या मुद्द्यावर लढायचं. सत्ताधाऱ्यांना थेट समोर बसून प्रश्न विचारायचा, अशी घोषणा त्यांनी केली. त्यासाठी मनोज जरांगे यांनी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला. अनेक इच्छुकांनी अर्ज केले, मराठवाडा, नाशिक भागात एका जागेसाठी कुठं दहा, तर कुठं पंधरा पेक्षा जास्त जणांनी उमेदवारी मागितली आहे. 180 जागांवर उमेदवार देण्याची रणनीती आखली जात आहे, अशी माहिती मनोज जरांगे यांनी आपल्या कार्यक्रमांमध्ये अनेकवेळा दिली आहे.