छत्रपती संभाजीनगर :दसऱ्याच्या दिवशी रावणाचं दहन करायची परंपरा देशात साजरी केली जाते. पुरुषांमधील असलेल्या वाईट वृत्तीचा नायनाट करण्यासाठी ही प्रथा सुरू करण्यात आलीय, परंतु पुरुष नाही तर स्त्रियांमध्येदेखील अशा प्रकारची चुकीची प्रवृत्ती आजच्या युगात पाहायला मिळते. त्यामुळेच पत्नी पीडित पुरुषांतर्फे शूर्पणखेला दहन करण्यात येते. वाळूज या एकमेव ठिकाणी ही अनोखी प्रथा सुरू करण्यात आली. गेल्या काही वर्षांमध्ये पत्नीपासून त्रस्त असलेल्या पुरुषांनादेखील न्यायाची गरज आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे महिलांसाठी कायदे आहेत, तसेच पुरुषांसाठीदेखील संरक्षण कायदे करण्याची मागणी यावेळी करण्यात आलीय.
पीडित पुरुषांनी केले शूर्पणखा दहन :दसऱ्याला वाईटावर विजय मिळवत प्रभू श्रीराम अयोध्येत परतले होते. त्यानंतर सीता मातेचे हरण केलेल्या रावणाचे दहन केले. पुरुषांमधील वाईट वृत्तीचा नायनाट करण्यासाठी ही प्रथा सुरू करण्यात आली. मात्र, कलियुगात पुरुषांप्रमाणे स्त्रियांनादेखील चुकीच्या प्रवृत्तीची लागण झालीय. रामायणात शूर्पणखेने रामाला भुलवण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच रामायण घडले आणि सर्वशक्तिमान, बुद्धिवान असलेल्या पराक्रमी रावणालाही अद्दल घडवली. आजच्या युगातदेखील अशा शूर्पणखा वाढल्या आहेत. त्यामुळे रावण जर वाईट होता तर शूर्पणखादेखील वाईट होती. त्यामुळे तिचंही दहन केलं पाहिजे, अस मत पत्नी पीडित पुरुष आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष भरत फुलारे यांनी व्यक्त केलंय.