नागपूर : हैदराबाद येथून नवी दिल्लीला जाणाऱ्या दक्षिण एक्सप्रेसमध्ये (१२७२१) (South Express Train) चार चोरट्यांनी मिळून एका प्रवाशाची हत्या केल्याची घटना घडली आहे. दक्षिण एक्सप्रेसच्या जनरल बोगीत ही घटना घडली आहे. सुशांक असं मृत प्रवाशी तरुणाचं नाव असून तो हैदराबादवरून दिल्लीला जात होता. तो मूळचा लाखीमपूर येथील रहिवासी आहे. ही घटना चंद्रपूर ते नागपूर दरम्यान घडली. इतर प्रवाश्यांनी चारही आरोपींना पकडून नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिलं. तर सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे यांनी दिली.
असा आहे घटनाक्रम : रात्री ११ च्या दरम्यान दक्षिण एक्सप्रेस ही गाडी नवी दिल्लीच्या दिशेने मार्गस्थ झाली. सुशांक हा हैदराबाद रेल्वे स्टेशनवर गाडीत बसला तर चार चोरटे हे देखील सिकंदराबाद स्थानकावरून गाडीत चढले होते. चोरीच्या उद्देशानेच हे चोरटे गाडीत प्रवास करत होते अशी माहिती, प्रियंका नारनवरे यांनी दिली.
चार चोरट्यांनी केली हत्या : दक्षिण एक्सप्रेस महाराष्ट्राच्या सीमेवर असतात ही घटना घडली. रात्री सर्व प्रवाशी हे झोपेत असताना चोरट्यांनी प्रवाशांचे मोबाईल, पैसेसह इतर साहित्य चोरण्यास सुरुवात केली. यावेळी सुशांकला जाग आली. त्यावेळी त्यानं लगेच आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळं संतापलेल्या चोरांनी त्या प्रवाशाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातच सुशांकचा मृत्यू झाला.