महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

किल्ले सिंहगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पालखी सोहळा थाटात, सिंहगडावर शिवभक्तांची अलोट गर्दी - Shivrajyabhishek On Sinhagad

Shivrajyabhishek On Sinhagad : पुणे जिल्ह्यातील सिंहगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित पालखी सोहळा थाटात साजरा करण्यात आला. यावेळी पारंपरिक वाद्याच्या तालावर छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवभक्तांनी एकच जल्लोष केला. जाणून घ्या या सोहळ्याचे अप्रतिम क्षण

Shivarajabhishek On Sinhagad
सिंहगडावर शिवभक्तांची अलोट गर्दी (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 9:31 PM IST

पुणेShivarajabhishek On Sinhagad : शंख, हलगी आणि पारंपरिक वाद्यांचा गजर, भंडारा आणि फुलांची उधळण, जय भवानी, जय शिवराय... छत्रपती संभाजी महाराज की जयचा अखंड जयघोष आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेल्या पालखीवर झालेली पुष्पवृष्टी... अशा शिवमय वातावरणात सिंहगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित पालखी सोहळा थाटात साजरा झाला. भगवे झेंडे घेऊन सिंहगडावर शिवरायांना मानवंदना देण्यासाठी जमलेल्या शिवभक्तांचा जनसागर इतिहासात घडलेला हा सुवर्णक्षण पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होता.

अभिवादन सोहळ्याचे सातवे वर्ष :विश्व हिंदू परिषद, पुणे आणि श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समितीच्या (किल्ले सिंहगड) वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अभिवादन सोहळ्याचे यंदाचे हे सातवे वर्ष होते. छत्रपती राजाराम पूलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून आयोजित विराट दुचाकी रॅली विठ्ठलवाडी, हिंगणे, माणिकबाग, धायरी फाटा, किरकटवाडी, खडकवासला, डोणजे, सिंहगड पायथा या मार्गाने सिंहगडावरील वाहनतळ येथे आली.

पूजनाकरिता पवित्र माती आणि पाण्याचा संगम :सिंहगडावरील वाहनतळापासून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी आणि कार्यक्रम मैदानापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत हलगी पथक, केशव शंखनाद पथक आदी सहभागी झाले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे पूजन करण्यात आले. यासोबतच सिंहगडावरील मंदिरे आणि ऐतिहासिक ठिकाणांचे पूजन देखील झाले. पूजनाकरिता विविध किल्ल्यांवरील पवित्र माती आणि पाणी आणण्यात आले होते.

गडकिल्ले शिवराज्याभिषेकाचे मूक साक्षीदार :किशोर चव्हाण म्हणाले, भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. आनंदनाम संवत्सर ज्येष्ठ शु. त्रयोदशी नृपशालिवाहन शके १५९६ या दिवशी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. त्या प्रसंगाचे मूक साक्षीदार म्हणजे स्वराज्यातील गड किल्ले होय. त्यामुळे श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन प्रत्येक गड किल्ल्यावर झाले पाहिजे. यासाठी किल्ले सिंहगडावर आम्ही हा सोहळा दरवर्षी आयोजित करतो. सर्व शिवभक्तांनी आपापल्या परिसरातील गड-किल्ल्यांवर हा सोहळा आयोजित करावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

हेही वाचा:

  1. विधानसभेसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? भाजपाच्या दाव्यानं शिवसेना, राष्ट्रवादीचं टेन्शन वाढण्याची शक्यता - Assembly Elections 2024
  2. ...अन्यथा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं मूळ आरक्षण सोडून सर्व रद्द करा - मनोज जरांगे पाटील - Maratha Reservation
  3. अमरावतीत कार्यालयावरून भाजपा-काँग्रेसमध्ये संघर्ष : खासदार बळवंत वानखडे, यशोमती ठाकूरांसह 15 जणांवर गुन्हा दाखल - Amravati MP Office Dispute

ABOUT THE AUTHOR

...view details