पालघर Palghar News : केंद्र सरकारच्या ‘हर घर जल योजने’चा मोठा डांगोरा पिटला जात असला, तरी ग्रामीण भागातील काही गावं मात्र या योजनेपासून कोसो मैल दूर आहेत. पालघर जिल्ह्यातील जव्हार शहरापासून अवघ्या पाच-सात मिनिटांच्या अंतरावर असलेल्या 'जांभळीचा माळ' या अडीच हजार लोकवस्तीच्या गावात नागरिकांना जंतू आणि किडेमिश्रित दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. तालुक्याच्या ठिकाणापासून जवळ असलेल्या गावाची ही व्यथा असेल, तर दुर्गम भागात काय होत असेल? याची कल्पनाच करता येत नाही. पालघर जिल्हा आदिवासी असूनही या भागात योजनांसाठी कोट्यवधी रुपये शासन खर्च करते. मात्र, अजूनही या भागातील लोकांना पाणी मिळत नाही.
टंचाई असताना टँकर नाही : जव्हार तालुक्यात अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू असले तरी या गावाला मात्र टँकर सुरू करण्यात आलेलं नाही. गेल्या पन्नास-साठ वर्षांपासून जांभळीचा माळ पाणीटंचाईचा सामना करतोय. निवडणुकीच्या वेळी मतदान मागण्यासाठी येणारे लोकप्रतिनिधी आश्वासनांचा पाऊस पाडतात. परंतु, त्यानंतर पिण्याच्या पाण्याचं आश्वासन पूर्ण करण्याकडं त्यांचं दुर्लक्ष होतं.
विहिरी आटल्या, झरे कोरडे :जांभळीचा माळ परिसरातील सर्व विहिरी आटल्या असून झरे कोरडे पडलेत. ग्रामपंचायतीनं बांधलेल्या विहिरीतील पाणी अत्यंत दूषित असून वापरण्यायोग्य नाही. या गावापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीतील पाणी आणण्यासाठी महिलांना दोन-तीन हंडे घेऊन जावं लागतं. शाळेतील चौथी-पाचवीच्या मुलींनाही दऱ्या, खोऱ्यात असलेल्या विहिरीतील पाणी आणण्यासाठी जुंपलं जातं. ही मुलं तयार नसली, तरी पालक बळजबरीनं त्यांना तयार करतात. दोन-दोन हंडे घेऊन मान मोडून ही मुलं दऱ्या-खोऱ्यातून पाणी आणतात.