पालघर Palghar Crime News : एकल कुटुंबात पती-पत्नीनं परस्परांच्या भावना लक्षात घेऊन वागलं पाहिजे. छोट्या छोट्या अपेक्षांकडे लक्ष दिलं नाही, तर क्षुल्लक कारण व्यक्तीला कोणत्याही थराला घेऊन जाऊ शकतं, याचं ज्वलंत उदाहरण डहाणू तालुक्यातील शिसणे शिपाई पाडा इथं घडलं. पतीनं फिरायला नेलं नाही, म्हणून आलेल्या रागातून पत्नीनं साडेचार महिन्याच्या चिमुरडीचा खून करुन स्वतःही आत्महत्या केली.
कुटुंबीयांपेक्षा मित्र जवळ केल्यानं टोकाचं पाऊल : मृत महिलेचा पती जयेश हा बोटीवर कामाला असतो. अनेक दिवसांच्या सुट्टीनंतर तो घरी आला होता. सुट्टीला घरी आल्यानंतर तरी त्यानं कुटुंबीयांसोबत वेळ घालवावा, अशी त्याच्या पत्नीची अपेक्षा होती. बोटीवर जास्त दिवस बाहेर राहावं लागतं. त्याचा विरह सहन करावा लागतो. सुट्टीवर आल्यानंतर तरी पतीनं वेळ द्यावा, या माफक अपेक्षेकडे दुर्लक्ष केल्यानं जयेशला पत्नी आणि बाळालाही गमवावं लागलं. कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यापेक्षा जयेश मित्रांसोबत फिरायला गेला. त्याचा राग त्याच्या पत्नीला आला होता. पतीनं आपल्याला सोबत फिरायला न्यावं, अशी तिची अपेक्षा होती. परंतु जयेश मात्र मित्रांच्या संगतीत अधिक रमला. कुटुंबीयांना वेळ देत नसल्याचा राग त्याच्या पत्नीला आला. रागाच्या भरात तिनं स्वतःच्याच साडेचार महिन्यांच्या मुलीचा खून केला आणि नंतर स्वतःचं जीवन संपवलं.