महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरमधील वाढीव मतदानाचा फायदा कोणाला? महायुती, महाविकास आघाडी, की बहुजन विकास आघाडीला?

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत पालघर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात कमी-अधिक फरकानं अधिक मतदान झाले. या वाढीव मतदानाचा फायदा कुणाला होणार? यावर वाचा सविस्तर बातमी

Palghar Assembly election result  prediction
पालघर मतदान अंदाज (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2024, 12:43 PM IST

पालघरः गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत पालघर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात कमी-अधिक फरकानं अधिक मतदान झाले. या वाढीव मतदानाचा काय परिणाम होणार? महायुती, महाविकास आघाडी की बहुजन विकास आघाडी यापैकी कोणाला वाढीव मतदान मिळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच शेवटच्या दोन दिवसात घडलेल्या नाट्यमय घडामोडीचा फायदा बहुजन विकास आघाडीला होणार आहे का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


पालघर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान विक्रमगड विधानसभा मतदारसंघात झालं आहे. त्याचे कारण तेथे चुरशीची तिरंगी लढत होती. या मतदारसंघात महायुतीचे हरिश्चंद्र भोये, महाविकास आघाडीचे सुनील भुसारा आणि अपक्ष उमेदवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यात लढत झाली. या मतदारसंघात 77.75 टक्के मतदान झाले.

पालघर जिल्ह्यात एकूण 65.95 टक्के मतदान (टक्केवारीत)

128-डहाणू : 72.5

129-विक्रमगड : 77.75

130-पालघर : 71.05

131-बोईसर : 66.17

132-नालासोपारा : 57.1

133-वसई : 60.46


बंडखोर बाजी मारणार, की आघाडीला फायदा होणार?मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारानं अगोदरच महाविकास आघाडीच्या सुनील भुसारा यांना पाठिंबा दिला होता. तर निकम यांच्या मागे जिजाऊ संघटनेचे पाठबळ होते. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाल्याने त्याचा फायदा महाविकास आघाडी उठवते की काय हे आता पाहावे लागेल. महायुतीच्या तुलनेत येथे महाविकास आघाडीत एकवाक्यता असल्याचे चित्र दिसत होते. अर्थात दोन निवडणुका लढवलेल्या निकम यांनी आता ही निवडणूक आपल्या अस्तित्वाचा मुद्दा बनवला होता. त्यांनी शिवसेनेच्या बहुतांश कार्यकर्त्यांना आपल्या पाठीशी उभे केले होते. या मतदारसंघात मतदारांना बाहेर काढण्यात कोण यशस्वी झाले, यावर आता निकाल ठरणार आहे.

गावित बाजी मारणार?पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी फक्त पालघर आणि डहाणू या दोनच विधानसभा मतदारसंघात दुरंगी लढत झाली. पालघरमध्ये अन्य उमेदवार जरी निवडणुकीच्या रिंगणात होते, तरी प्रत्यक्ष शिवसेनेचे राजेंद्र गावित आणि शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार जयेंद्र दुबळा यांच्यात लढत झाली. या मतदारसंघातील शिवसेनेत (UBT) कमालीचा असंतोष होता. त्यातच लोकसभेच्या उमेदवार भारती कामडी यांनी प्रचारात सहभागी होण्याचं टाळले. त्यांची अप्रत्यक्ष मदत शिवसेनेला झाली. त्यामुळे या मतदारसंघात गावित यांचे पारडे काहीसे जड होते. या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात 71.05 टक्के मतदान झाले. गावित यांचे सर्वच पक्षांशी असलेले चांगले संबंध आणि विधानसभा मतदारसंघात त्यांची कार्यकर्त्यांची असलेली स्वतंत्र फळी याचा उपयोग कदाचित त्यांना झालेला असू शकतो.



नालासोपाऱ्यातील नाट्य कुणाच्या पथ्थ्यावर?नालासोपारा या मतदारसंघात मतदानाच्या अगोदरच्या दिवशी नाट्य घडले. पैसे वाटपावरून भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह तेथील उमेदवार राजन नाईक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. असे असले तरी प्रत्यक्षात चार तासांच्या महानाट्यानंतर विनोद तावडे, आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितीज ठाकूर हे एकाच गाडीतून गेल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य कमी झाले. त्यातच नालासोपारा मतदारसंघात तिरंगी लढतआहे. या वेळी मागचेच उमेदवार पक्ष बदलून निवडणुकीच्या रिंगणात होते. अर्थात या मतदारसंघात अवघे 57.1 टक्के मतदान झाले. हे कमी मतदान कुणाला फटका बसवेल? हे आता निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. असे असले तरी क्षितीज ठाकूर यांच्या विरोधातील मतदार बाहेर काढण्यात विरोधकांना फारसे यश आलेले नसावे, असा त्याचा निष्कर्ष काढला जात आहे. येथे भाजपाकडून राजन नाईक निवडणुकीच्या रिंगणात होते.



डहाणूतील राजकीय भूकंपाचे धक्के-नालासोपाऱ्यात कथित ‘नोट जिहाद’चा फटका डहाणू विधानसभा मतदारसंघात बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डहाणू विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवी यांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी ऐन मतदानाच्या अगोदरच्या दिवशी भाजपात आणून मोठी खेळी केली. परंतु ही खेळी उलटवण्यासाठी बहुजन विकास आघाडीनं या मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विनोद निकोले यांना बिनशर्त पाठिंबा दिला. या मतदारसंघात सुमारे 12-13 हजार मते बहुजन विकास आघाडीची असल्याचं सांगितले जाते. या मतदारसंघातून निकोले यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातून विनोद मेढा हे उमेदवार होते. डहाणूचा शहरी मतदारसंघ वगळता ग्रामीण भागात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व आहे. पाडवी हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार होते. त्यांनी शेवटच्या क्षणी जरी भाजपला पाठिंबा दिला असला, तरी त्यांचे नाव उमेदवारी यादीत कायम होते. त्यामुळे त्यांना किती मते मिळाली, हेही पाहावे लागेल. अर्थात या मतदारसंघातील महानाट्याचा फायदा कदाचित महाविकास आघाडीच्या निकोले यांना फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डहाणू विधानसभा मतदारसंघात 72.5 टक्के मतदान झाले.


वसई-बोईसरचे बालेकिल्ले बहुजन विकास आघाडीकडेच?बोईसर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होती. या मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांच्या विरोधात शिवसेनेचे विलास तरे आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) डॉ. विश्वास वळवी हे दोन उमेदवार रिंगणात होते. या मतदारसंघात 66.17 टक्के मतदान झाले. हे मतदान सरासरी इतके आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटात ठाकूर यांच्या विरोधातील मतांचे विभाजन झाले असण्याची शक्यता आहे. विरोधी दोन्ही उमेदवार बाहेरचे असल्याचा प्रचार झाला. वसई विधानसभा मतदारसंघातही तिरंगी लढत होती. या विधानसभा मतदारसंघात 60.46 टक्के मतदान झाले. हे मतदानही नेहमीच्या सरासरी इतकेच आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या विरोधातील मतदान विरोधकांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यात फारसे यश आलेले नाही, असे एकूण चित्र आहे. त्यातच आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात भाजपाच्या स्नेहा दुबे-पंडित आणि काँग्रेसचे विजय पाटील हे उभे होते. पाटील यांनी तर निवडणूक सोडल्यासारखेच चित्र होते. पंडित यांनी चांगली लढत दिली असली, तरी 2009 ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता तशी कमी दिसते.



मतदान शांततेत; सुविधांची वानवा-जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भरपूर तयारी करूनही निवडणूक आयोगाच्या निकषाप्रमाणे अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर सोयी-सुविधा पुरविण्यात जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेला अपयश आल्याचे चित्र होते. आदिवासी भागातील मतदान केंद्रात ज्येष्ठांना बसण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, व्हीलचेअर, सॅनिटायझर, हँडवॉश आदी कोणत्याच सुविधा नसल्याचे स्पष्ट झाले. मतदारांनी विशेषतः वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी मतदान करत लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील 53 उमेदवारांचे नशीब ‘ईव्हीएम’ मध्ये बंद झाले असून आता साऱ्या नजरा शनिवारच्या निकालाकडे लागल्या आहेत.

हेही वाचा-

  1. पालघर जिल्ह्यात महायुतीच्या सहा जागा निवडून येणार; भाजपाच्या नेत्याचा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details