धुळे :प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2025) पूर्वसंध्येला केंद्र सरकारनं पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यात महाराष्ट्रातील काही बड्या चेहऱ्यांचाही समावेश आहे. त्यातीलच एक म्हणजे चैत्राम पवार (Chaitram Pawar) आहेत. वन आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चैत्राम पवार यांना पद्मश्री (padma shri) पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय.
कोण आहेत चैत्राम पवार? : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दुर्गम भागात असलेला बारीपाडा हा वनवासीपाडा आहे. या पाड्यात सन 1992 पूर्वीची उजाड, ओसाड माळरान, पिण्यासाठी घोटभर पाणी नाही, अशी परिस्थिती होती. मात्र, 1992 नंतर या पाड्याचं चित्र पालटलं. चैत्राम पवार यांनी बारीपाडा गावात विजेसह शेतीला आणि ग्रामस्थांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं. यामुळं परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांचं जीवनमान उजळलं.
मिळविले आहेत अनेक मानाचे पुरस्कार-चैत्राम पवार यांनी गावात सोलार प्लांटद्वारे शेतकऱ्यांना नवीन दिशा दाखवली. यामुळं शेतासह ग्रामस्थांना मुबलक पाणी उपलब्ध होऊ लागलं. जगातील 78 देशांमध्ये चांगले गाव कसे असावे? याविषयी झालेल्या तज्ञांच्या सर्व्हेमध्ये बारीपाडानं द्वितीय क्रमांक पटकावलाय. त्याचबरोबर बारीपाडा प्रकल्पास अत्यंत मानाचा समजला जाणारा IFAD या आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार मिळालेला आहे. अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त करणाऱ्या चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानं धुळे जिल्ह्यात अत्यंत आनंद व्यक्त होत आहे. त्यांचा सन्मान संपूर्ण खान्देशसाठी अभिमानास्पद आहे.
- राज्य सरकारनं आरोग्य, खेळ, साहित्य, कला तसंच इतर क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान केलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणानंतर देशातील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंताचा सहभाग आहे.
हेही वाचा -
- सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर काय म्हणाले अरण्यऋषी मारुती चितमपल्ली?
- महाराष्ट्रातले 'पद्म' पुरस्कार विजेते 'ईटीव्ही भारत'वर Exclusive
- केंद्र सरकारकडून 'पद्म' पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील 'या' दिग्गजांचा सन्मान