नांदेड Nanded Honor Killing :समाजात होत असलेल्या बदनामीच्या भीतीनं आई-वडिलांनीच पोटच्या मुलीला विळ्यानं वार करून हत्या केली आहे. या घटनेनंतर नांदेड एलसीबीचे पथक आणि धर्माबाद येथील धर्माबादचे उपविभागीय अधिकारी तसंच भोकर पोलीस घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
काय आहे प्रकरण : या घटनेसंदर्भात हिमायतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील नेहरूनगर भागात कुटुंब राहते. या कुटुंबातील मुलीचे (वय 17) सूत परिसरातील एका युवकाशी जुळले होते. हा प्रकार लक्षात आल्यावर घरच्यांनी मुलीस समजावून सांगत आंतरजातीय प्रेम करणं चुकीचं आहे, अशी समज दिली होती. तरीदेखील मागील महिन्याभरापूर्वी ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. तेव्हा मुलीच्या कुटुंबीयांनी प्रियकराविरोधात हिमायतनगर पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्यांचा शोध घेतला. तसंच मुलीची समजूत काढत तिला आई-वडिलांच्या स्वाधीन केलं. मात्र, यानंतरही मुलीच्या वागण्यात काही सुधारणा झाली नाही. तिने पुन्हा एकदा प्रियकराबरोबर लग्नाचा अट्टहास धरला.
पोटच्या पोरीची धारदार शस्त्रानं केली हत्या : मुलीमुळं समाजात होत असलेल्या बदनामीच्या भीतीनं तिच्या आई-वडिलांनी तिला संपवण्याचा निर्णय घेतला. तसंच गुरुवारी (1 फेब्रुवारी) मध्यरात्री ती गाढ झोपेत असतांना विळ्यानं तिच्या डोक्यावर आणि कपाळावर वार करून तिची हत्या केली. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी मुलीचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन केले. मुलीच्या खून प्रकरणी आई-वडिलांना ताब्यात घेतल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसंच मुलीच्या हत्येप्रकरणी कलम 302 अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी व त्यांचे सहकारी करत आहेत.
हेही वाचा -
- दुसऱ्या धर्मातील तरुणाबरोबर बहिणीचं प्रेमप्रकरण, संतापलेल्या भावानं अल्पवयीन बहिणीची गोळ्या झाडून केली हत्या
- Honor Killing in Mumbai : मुंबईत ऑनर किलिंग; आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्यानं वडील, भावानं तरुणीसह युपीच्या प्रेमवीराला संपवलं!
- Honor Killing News : आठ महिन्यानंतर घरी आलेल्या तरुणीची आई-वडिलांकडून हत्या, नेमकं काय घडलं?