नाशिक : मकरसंक्रांतीचा सण नाशिक जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, आता पतंग उडवण्यासाठी बंदी असतानाही वापरल्यानं, नायलॉन मांजा नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. गेल्या महिन्याभरात नाशिक जिल्ह्यात नायलॉन मांजामुळं दोन जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस प्रशासनानं नायलॉन मांजावर बंदी घातली असली तरी छुप्या पद्धतीनं नायलॉन मांजाची विक्री सुरूच आहे. नाशिक पोलिसांनी महिन्याभरात 19 मांजा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले असून 22 संशयितांना ताब्यात घेतलंय. तर 6 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आलीय. आत्तापर्यंत नायलॉन मांजाचे 843 गट्टू, असा सुमारे 6 लाख 50 हजाराचा माल पोलिसांनी हस्तगत केलाय.
नायलॉन मांजामुळे घडलेल्या अपघाताच्या घटना :
- नाशिक शहरातील वडाळा गावात नऊ वर्षीय बालकाचा नायलॉन मांजामुळं मृत्यू
- ओझर उड्डाणपुलावर जळगाव जिल्ह्यातील दुचाकीस्वारांचा मांजामुळं गळा चिरून मृत्यू
- नाशिक-पुणे रोडवर युवकाची नायलॉन मांजामुळं करंगळी कापली
- लेखा नगरला दुचाकीस्वाराचा मांजामुळं गळा चिरला आणि 28 टाके पडले
- वडाळा येथे दुचाकीस्वाराचा मांजामुळे गळा कापला आणि 40 टक्के पडले
- सावरकर सिडको येथे एका व्यक्तीच्या हाताची बोटं कापली गेली
- सिन्नर येथील एकाच कुटुंबातील तिघांना नायलॉन मांजामुळं गंभीर जखमा
- द्वारका भागात महिला नायलॉन मांजामुळं जखमी. कान, नाक, डोळ्याजवळ गंभीर जखमा.
साडेतीन किलो ताण पेलवणार नायलॉन मांजा : पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा सुरती मांजाचा ताण तपासला असता 3 किलोपर्यंत ताण सहन करण्याची त्यात क्षमता असल्याचं आढळून आलं. तसंच नायलॉन मांजा साडेतीन किलोपर्यंत ताण सहन करू शकतो, तर साधा मांजा जवळपास एक किलोपर्यंत टिकू शकतो.
ड्रोनद्वारे पाहणी करणार : "नायलॉन मांजा तपासणीसाठी पालिका आणि पोलिसांची पथकं तयार करण्यात आली आहेत. नायलॉन मांजा विक्रीसह वापरावरही बंदी आहे. त्यामुळं कोणीही मांजा वापर करू नये, अन्यथा दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल", असं येवला येथील मुख्याधिकारी तुषार आहेर म्हणाले. तर नायलॉन मांजाच्या वापरावर ड्रोनद्वारे पाहणीचं नियोजन केलं असून ही पाहणी स्वतंत्र असणार असल्याचं येवला पोलिसांनी सांगितलं.