नाशिक Nashik Accident News :पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या भगूर येथे घडली आहे. अमित रामदास गाढवे (वय 40) असं मृत्यु झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. लिकेज असलेल्या पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून हा अपघात झाला. नगरपालिकेच्या कामकाजाबाबत स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करण्यात येत आहे.
असा घडला अपघात :याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी तुळसा लॉन्सजवळ पाण्याची पाईपलाईन लिकेज असल्यानं सकाळी या ठिकाणी दुरुस्तीसाठी खड्डा करण्यात आला होता. मात्र, पाईपलाईन दुरुस्त केल्यानंतर देखील हा खड्डा बुजवण्यात आला नव्हता. शनिवारी दिवसभर पाऊस पडल्यानं खड्ड्यात पाणी साचलं होतं. खड्डयाभोवती कोणताही फलक देखील लावण्यात आला नव्हता. यावेळी खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे दुचाकीवरून जात असलेल्या अमित गाढवे हे त्या खड्ड्यात पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला, मेंदूला जबर मार लागला. यावेळी उपस्थित नागरिकांनी अमित गाढवे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता, तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला.