मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी जनतेतून तीव्र भावना उमटत आहेत. मंगळवारी पुण्यात खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड यानं सीआयडीसमोर शरणागती पत्करली आहे. तर दुसरीकडं मुंबईत आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केलीय. दरम्यान, "या प्रकरणात कुणाची गय केली जाणार नाही. दोषीवर कडक कारवाई केली जाईल, अशा प्रकारे कुणाचीही हिंसा करता येणार नाही," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
सीआयडीला पूर्ण अधिकार :"या प्रकरणाचा छडा लागत नाही आणि आरोपींना आम्ही शोधत नाही. तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. यातील आरोपींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. आरोपी जोपर्यंत फासावर लटकत नाहीत, तोपर्यंत पोलीस कारवाई करतील. अशा प्रकारच्या सूचना मी पोलिसांना दिल्या आहेत," असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच 302 गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला असता, "कुठला गुन्हा दाखल करायचा? कोणते कलम लागणार आहे? याबाबत पोलीस निर्णय घेतील. पोलीस ब्रीफिंग करतील... जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला देण्यात आली आहे. सीआयडीला पूर्ण स्वायत्तता दिली आहे. पूर्ण अधिकार दिले आहेत. सीआयडीवर कोणाचाही दबाव नसणार किंवा सीआयडीवर कोणाचाही दबाव खपवून घेतला जाणार नाही," असं यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.